Thu, Aug 22, 2019 08:44होमपेज › Sangli › जिल्ह्यात एकाच दिवशी तीन खून

जिल्ह्यात एकाच दिवशी तीन खून

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 11:00PMसांगली  :  प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यात  खुनाच्या तीन घटना घडल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. सांगलीजवळील कुपवाड, जत तालुक्यातील माडग्याळ व कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथे खुनाच्या या घटना घडल्या. कुपवाडमध्ये चार , माडग्याळमध्ये दोन आणि हिंगणगाव खुर्दमध्ये एकाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे.  

कुपवाडमध्ये तरूणाचा खून 

कुपवाड : वार्ताहर 

शहरातील सागर भीमराव माळी(वय26, रा.जुना बुधगाव रस्ता, कुपवाड) या  तरूणाचा अनैतिक संबंधातून शुक्रवारी पहाटे खून करण्यात आला.  मुख्य संशयित रमेश सिद्राम सूर्यवंशी (वय46,रा.कापसे प्लॉट, कुपवाड) हा स्वतःच कुपवाड पोलिसात हजर झाला. या प्रकरणी सूर्यवंशी याच्या अन्य तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. 

मृत सागर माळी व संशयित रमेश सूर्यवंशी  दोघेही शेजारी राहत होते. दोघेही  ड्रायव्हर म्हणून काम करतात. माळी याचे   संशयित सूर्यवंशी याच्या पत्नीबरोबर गेल्या अनेक महिन्यापासून अनैतिक संबंध होते. त्यामुळे माळी व सूर्यवंशी यांच्यात काही दिवसांपूर्वी वादावादी झाली होती. शहरातील काहींनी  या दोघांतील व पती- पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी केली होती. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले होते. 

त्यानंतर या प्रेमी युगुलाने पलायन केले. गेल्या आठवड्यात सूर्यवंशी याने पत्नी घरातून गायब झाल्याची फिर्याद कुपवाड पोलिसात दाखल केली होती. त्यानंतर तो व त्यांच्या साथीदारांनी माळी व गायब पत्नीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. 

माळी हा सूर्यवंशीच्या पत्नीसह  इचलकरंजीत  असल्याची माहिती त्याला मिळाली.  त्यानंतर सूर्यवंशी व त्याच्या साथीदारांनी गुरूवारी रात्री माळी  व त्या महिलेला इचलकरंजीतून  कुपवाडमध्ये आणले. सूर्यवंशी याने पत्नीला एका नातेवाईकाच्या घरात थांबायला सांगितले. नंतर  माळी याला रिक्षातून कुपवाड- मिरज रस्त्यालगतच्या परिसरात नेले. तिथे सूर्यवंशी व त्याच्या साथीदारांनी त्याला बेदम मारहाण  केली. 

 नंतर  त्यांनी त्याला  पुन्हा कापसे प्लॉटमधील सूर्यवंशी याच्या नातेवाईकाच्या घरी नेले. तिथेही  चौघांनी काठ्यांनी त्याला मारहाण केली केली. या मारहाणीत माळी याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर  मृतदेह  सांगलीत कृष्णा नदीच्या पुलावरून नदीत फेकून दिला. 

सूर्यवंशी कुपवाड पोलिस ठाण्यात आज सकाळी हजर झाला. पोलिसांनी  त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या अन्य तीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. संशयितांनी माळी याचा  मृतदेह नदीत फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले.  त्यामुळे पोलिसांनी आज सकाळपासून नदीत मृतदेहाची शोध मोहीम जोमात राबविली.मात्र रात्री उशिरापर्यंत मृतदेह हाती लागला नाही.या प्रकरणाची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत  सुरू होते.

हिंगणगाव खुर्दला तरूणाचा खून 

कडेगाव : शहर प्रतिनिधी 

तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथे गोविंद उईके (वय20, रा.चरे डोंगरी ,जिल्हा-मंडला , मध्यप्रदेश ) याचा  किरकोळ भांडणाच्या कारणावरून  दारूच्या नशेत लाकडी ओंडके डोक्यात घालून खून करण्यात आला. याप्रकरणी कुकरे (जिल्हा मंडला ,मध्यप्रदेश ) येथील अल्पवयीन युवकाविरुद्ध कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गोविंद उईके आणि ब्रिजेस मरकाम हे दोघे तरुण  हळद काढण्याचे काम करतात. हिंगणगावच्या हद्दीत चंद्रकांत संपत जाधव यांच्या शेतामध्ये हळद काढण्यासाठी ते काम करीत होते.गुरुवारी (दि.22 ) रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान हे दोघेही तरुण दारू पिऊन नशेत  भांडत होते.या भांडणाच्या रागात संशयित युवकाने गोविंद उईके याच्या डोक्यात  आणि पाठीत मानेच्या मागील बाजूस  लाकडी ओंडक्याने मारहाण केली.या मारहाणीत गोविंद गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत हिंगणगावचे पोलिस पाटील दत्तात्रय बबन जाधव(वय45) यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.संशयित आरोपी हा अल्पवयीन असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.पोलिस निरीक्षक के.एस.पुजारी तपास करीत आहेत.

माडग्याळमध्ये कौटुंबिक वादातून महिलेचा खून 

माडग्याळ  :  वार्ताहर

 येथे कौटुंबिक  वादातून  राधाबाई  तिप्पाण्णा  माळी (वय 50) यांचा  गळा  आवळून आणि  विळ्याने  व  दगडाने  डोक्यात वार करून अमानुषपणे खून करण्यात आला. गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. राधाबाई हिचा  पती तिप्पाण्णा गंगाराम माळी (वय 55) व सवत विमलाबाई  तिप्पाण्णा माळी (वय 40, दोघे रा. माडग्याळ) या दोघांना संशयावरून उमदी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही संशयितांनी  मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा  प्रयत्न केला. पण  लोकांची चाहूल  लागल्याने मृतदेह शेजारच्या  घरासमोर टाकून  पळ काढला. या घटनेची माहिती सकाळी समजल्यावर राधाबाई यांचा  गावातच राहणारा भाऊ शरणाप्पा विठ्ठल कोरे  यांनी  उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिप्पाण्णा माळी व विमलाबाई माळी यांना अटक केली. रात्री त्यांच्याविरुद्ध खुनाचा व पुरावा नष्ट केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला.

 घटनास्थळावरून व पोलिसांकडून  मिळालेली माहिती अशी ः तिप्पाण्णा माळी हिचा राधाबाई हिच्याशी पंचवीस वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर थोड्या वर्षांपर्यंत त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. त्यानंतर  त्या दोघात  वाद सुरू झाला. राधाबाई माळी या गेल्या 10 ते 11 वषार्ंपासून पतीपासून विभक्त होऊन उटगी येथे भावाजवळ राहत होती. 

त्यानंतर  तिप्पाण्णा याने विमलाबाई हिच्याशी विवाह केला. पण गेल्या वर्षी गावातील काही लोकांनी  राधाबाई व तिप्पाण्णा यांच्यात मध्यस्थी केली. यानंतर ती पुन्हा माडग्याळ येथे तिप्पाण्णा याच्याच्यासोबत राहू लागली. 

मात्र  काही दिवसानंतरच  तिप्पाण्णा व सवत विमलाबाई यांच्याबरोबर  राधाबाईचा दररोज किरकोळ कारणावरुन  वाद होऊ लागला. दररोजच्या भांडणाला कंटाळून तिप्पाण्णा व विमलाबाई या दोघांनी मिळून राधाबाई हिचा गुरुवारी मध्यरात्री निर्घृणपणे  खून केला, असे  पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 

घटनास्थळी जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी नागनाथ वाकुडे यांनी भेट दिली. उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे व उपनिरीक्षक पी. एम. सपांगे यांना  तपासासाठी  सुचना दिल्या. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताचे  नमुने व इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत.