Fri, Feb 22, 2019 07:27होमपेज › Sangli › हॉटेल मालकासह दोघांची नावे निष्पन्न

हॉटेल मालकासह दोघांची नावे निष्पन्न

Published On: Jan 23 2018 1:14AM | Last Updated: Jan 22 2018 11:38PMसांगली : प्रतिनिधी

शास्त्री चौकात झालेल्या सुनील आंबी या शिक्षकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी शहरातील एका बड्या हॉटेलच्या मालकासह दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. ते दोघेही गायब झाले आहेत. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. या गुन्ह्यात वापरलेली मारूती कार जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली. 

याप्रकरणी हॉटेल मालक लोकेश नाईक या संशयिताची गुन्ह्यात वापरलेली मारूती कार (एमएच 10 बीएम 4677) जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत गुंड रवि खत्री, हॉटेल डायमंडचा वेटर राकेश चव्हाण, सुहास उर्फ तम्मा ऐवळे, प्रदीप मोरे यांना अटक केली आहे. या चौघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आंबी हे विश्रामबाग येथील एका शाळेत शिक्षक होते. त्याच शाळेत मोरेंची पत्नी शिक्षिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून आंबी हे मोरे यांच्या पत्नीस मोबाईलवरून फोन आणि मेसेज पाठवून त्रास देत होते. याची माहिती मिळाल्यानंतर दि. 26 डिसेंबररोजी रात्री साडेअकराच्या सुमारास  आंबी यांना  मोबाईलवर फोन करून चर्चा करायची आहे, असे  सांगून शास्त्री चौकात बोलावून घेतले. तेथे आल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.  ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्यानंतर  नाईकच्या कारमध्ये त्यांना घालून शंभर फुटी रस्ता परिसरात जखमी अवस्थेत सोडून देण्यात आले.  त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दि. 4  जानेवारीरोजी त्यांचा मृत्यू झाला. 

आंबी यांच्या नातेवाईकांनी  निरीक्षक शेळके यांची भेट घेऊन हल्लेखोरांनी सोन्याची चेन आणि अंगठी लंपास केल्याची तक्रार केली. त्यानंतर हल्लेखोरांवर दरोडा आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर पत्नीला त्रास देत असल्यानेच आंबी यांना मारहाण केली. त्यात ते बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना शंभरफुटी रस्त्यावरील साईमंदिराजवळ सोडून देण्यात आले.  यातील एक संशयित लोकेश नाईक शहरातील एका बड्या हॉटेलचा मालक आहे. त्याशिवाय आणखी एक संशयित असे दोघेजण गुन्हा दाखल झाल्यापासून गायब झाले 
आहेत.