Tue, Apr 23, 2019 19:31होमपेज › Sangli › थांबता थांबेना साखर दरातील घसरण

थांबता थांबेना साखर दरातील घसरण

Published On: Jan 23 2018 1:14AM | Last Updated: Jan 22 2018 9:06PMसांगली : विवेक दाभोळे  

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली साखरेच्या दरातील घसरण थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, या हंगामात अनेक ठिकाणी शेतकर्‍यांची कोट्यवधीची ऊसबिले प्रलंबित राहिली आहेत.  दरम्यान, साखरेच्या दरातील घसरणीने मूल्यांकनाला झटका बसणार आहे. 

चालू गळीत हंगाम कारखानदारांसाठी चांगलाच अडथळ्याची शर्यत बनू लागला आहे. एकीकडे उसासाठी करावी यातायात आणि याच दरम्यान आता साखरेच्या दरातील घसरगुंडी कायम राहिल्याने कारखानदारांची चांगलीच कोंडी झाली आहे. या हंगामासाठी पहिली उचल देताना एफआरपी अधिक 175 रु. प्रतिटन अशी रक्कम एकरकमी देण्याचा तोडगा निघाला होता. मात्र आता गळीत हंगाम मध्यावर आला असतानाच साखरेच्या दरातील घसरण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

दोन दिवसांपूर्वीपर्यंत 3250 रु. प्रतिक्विंटलच्या घरात असलेला साखरेचा दर पुन्हा  150 रुपयांनी खाली घसरला. आता हा दर 3100 रु.  प्रतिक्विंटल झाला आहे. यावेळचा हंगाम सुरू होताना हाच दर 3900 रुपयांच्या घरात होता.  हंगाम सुरू होत असतानाच पुन्हा नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये साखर दरात घसरण झाली. त्यावेळी  राज्य बँकेने साखरेचे मूल्यांकन कमी केले होते. त्यामुळे एफआरपी देण्याचे देखील आव्हान पेलेल की नाही अशी स्थिती कारखानदारांची झाली असतानाच आता पुन्हा एकदा  पुन्हा साखरेचे दर कमी होऊ लागले आहेत.  

दोन महिन्यांपूूर्वी साखरेचा दर चार हजारांवरुन 3,500 रुपयांवर आल्यानंतर राज्य बँकेने साखरेचे मूल्यांकन कमी केले होते. नंतर  पुन्हा साखर 3,100 ते 3,200 रुपयांवर आल्यानंतर परत मूल्यांकन कमी झाले आहे. यामुळे  एफआरपी देखील कशी देणार, असा सवाल केला जातो आहे.