Wed, Sep 26, 2018 12:10



होमपेज › Sangli › साखरेस ८५ टक्क्यांवर कर्जास राज्य बँकेचा नकार

साखरेस ८५ टक्क्यांवर कर्जास राज्य बँकेचा नकार

Published On: Jan 23 2018 1:14AM | Last Updated: Jan 22 2018 10:05PM



सांगली : प्रतिनिधी

राज्य सहकारी बँक बाजारातील दरानुसार साखरेचे मूल्यांकन ठरविते. साखर पोत्यांवर 85 टक्क्यांपर्यंतच तारण कर्ज दिले जाईल.  कारखान्यांच्या मागणीनुसार 95 टक्क्यांपर्यंत कर्ज दिल्यास बँका अडचणीत येतील, असे स्पष्टीकरण  राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष एम. एल. सुखदेवे यांनी केले. 

राज्य बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष एम. एल. सुखदेवे, नाबार्डचे उपसरव्यवस्थापक डी. के. गवळी यांनी सोमवारी सांगली जिल्हा बँकेला सदिच्छा भेट दिली. बँकेच्या संचालक मंडळाशी संवाद साधला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण व संचालक उपस्थित होते. 

राज्य बँकेने साखरेचे मुल्यांकन घटविले आहे. त्यामुळे साखर कारखाने चिंतेत आहेत. उसाला ‘एफआरपी’नुसार दर देताना कारखान्यांची कसरत होणार आहे. साखर पोत्यांवरील तारण कर्ज 85 टक्क्यांऐवजी 95 टक्के करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने केलेली आहे. त्याकडे लक्ष वेधले असता सुखदेवे म्हणाले,  साखर पोत्यांवर 85 टक्क्यांपर्यंतच तारण कर्ज दिले जाईल. 85 टक्क्यांवर तारण कर्ज देता येणार नाही. 

साखरेचे मुल्यांकन असे ठरते..!

सुखदेवे म्हणाले, तीन महिन्यांचा साखरेचा सरासरी दर किंवा साखरेचा बाजारातील आजचा दर यातील जो दर कमी असेल तो निश्‍चित केला जातो. त्यावर 85 टक्क्यांपर्यंत तारण कर्ज दिले जाते. बाजारातील साखरेचा दर  मुल्यांकन यात 15 टक्के मार्जिन ठेवले जाते. त्यामुळे 85 टक्क्यांपर्यंतच साखरेवर तारण कर्ज देता येईल. 85 टक्क्यांवर तारण कर्ज दिले जाणार नाही. 85 टक्क्यांहून अधिक कर्ज दिले तर बँका अडचणीत येतील.