Tue, Jul 23, 2019 06:13होमपेज › Sangli › लेखी हमीनंतरही शेरीनाला कृष्णेतच

लेखी हमीनंतरही शेरीनाला कृष्णेतच

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:35PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेने शेरीनाल्याचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या विभागीय अधिकार्‍यांना लेखी हमीही दिली. पण आठवडा उलटूनही काही उपाययोजना नाहीत. उलट तळ गाठल्याने नदीत आता केवळ शेरीनाल्याचीच गटारगंगा उरली आहे. बंधार्‍याचे दरवाजे बंद असल्याने हे साठलेल्या पाण्याने दुर्गंधी पसरली आहे. मात्र, पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्याबाबत काहीच उपाययोजना नाहीत. यामुळे पाणीप्रदूषण आणि दुर्गंधीने नागरी आरोग्य धोक्यात आले आहे.

कृष्णेची गटारगंगा करणारे शेरीनाल्याचे प्रदूषण थोपविण्यासाठी शुद्धिकरण योजनेवर 40 कोटी रुपयांचा खर्च केला. परंतु अद्याप शेरीनाला योजना पूर्ण कार्यरत झालेली नाही. अद्याप सांडपाणी नदीतच मिसळत आहे. दुसरीकडे जिझिया मारुतीमार्गे संपूर्ण गटारगंगा थेट नदीतच मिसळू लागली आहे. 

वास्तविक नदी प्रदूषणाबद्दल महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार नोटिसा दिल्या. त्यापोटी वार्षिक दीड कोटी रुपयांहून अधिक दंडही भरावा लागत आहे. गेल्या चार वर्षांत सुमारे आठ सहा कोटी रुपये दंड भरला, तरीही तरीही हे प्रदूषण रोखण्याबाबत काहीच हालचाली नाहीत. त्यामुळे नागरिक हैराण आहेत.

शेरीनाल्याचे प्रदूषण रोखण्यासाठी शेरीनाला शुद्धिकरण योजना राबविण्यात आली आहे. शहराचे सांडपाणी थेट धुळगाव येथे नेऊन शुद्धिकरणाद्वारे शेतीला देण्यासाठी प्रकल्प राबविला आहे. त्यावर आजअखेर 38-40 कोटी रुपये खर्च झाले आहेत. परंतु अद्याप ती योजन शंभर टक्के यशस्वी झाली नाही. 

वास्तविक 15 दिवसांपूर्वी  अशाच प्रकारे प्रदूषणामुळे माशांसह अन्य जलचर मृत झाले होते. अर्थात शेरीनाल्याबरोबरच या केमिकलमिश्रित गटारगंगेमुळे हा प्रकार घडला होता. याची गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली होती. यामध्ये हे प्रदूषण न थांबविल्यास आयुक्त कार्यालयाचा पाणी व वीजपुरवठा थांबविण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात गेल्या आठवड्यात कोल्हापूर विभागीय अधिकार्‍यांसमोर सुनावणीही झाली होती.

यावेळी महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता तसेच जलनि:स्सारण अभियंता शीतल उपाध्ये यांनी प्रदूषण रोखण्याबाबत लेखी हमी दिली होती. यामध्ये 5 पंप खरेदी, तत्काळ अमरधाम स्मशानभूमीजवळ शेतकर्‍यास नुकसानभरपाई देऊन पाईपलाईन जोडणार असल्याचे सांगितले होते. यामुळे शेरीनाल्याचे प्रदूषण कायमचे थांबेल असेही लेखी दिले आहे. परंतु आठवडा उलटूनही याबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. यासंदर्भात आढावाही घेतलेला नाही. 

उलट आता शेरीनाल्यासह सर्वच सांडपाणी नदीत मिसळू लागले आहे. नदीने तळ गाठला आहे. त्यामुळे बंधार्‍यापासून आयर्विन पुलापर्यंत निव्वळ शेवाळयुक्त गटारगंगाच उरली आहे. या प्रदूषणाचा फटका मागे जॅकवेलपर्यंत पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांना शेरीनालायुक्त दूषित पाणीपुरवठा होऊन साथीचा फैलाव होण्याचा धोका आहे.