Tue, Nov 13, 2018 23:33होमपेज › Sangli › कोर्ट फी स्टॅम्प दरवाढीला तीव्र विरोध

कोर्ट फी स्टॅम्प दरवाढीला तीव्र विरोध

Published On: Jan 23 2018 1:14AM | Last Updated: Jan 22 2018 11:33PMसांगली : प्रतिनिधी

सरकारने तिकीटांचे पाचपट दरवाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे. ही दरवाढ मागे घेण्याची मागणी होत आहे. याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

याबाबत वकील संघटनेचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब पवार म्हणाले, शासनाने न्यायालयीन तिकीट दरात केलेली वाढ चुकीची आहे. थोडी वाढ ठीक होती, मात्र पाचपट वाढ झाल्याने सामान्य पक्षकारांना फटका बसणार आहे. जनतेला कमीत- कमी पैशात कसा न्याय मिळेल, याची व्यवस्था सरकारने करायला हवी. या दरवाढी विरोधात वकील संघटेची बैठक घेऊन ठराव करणार आहोत. त्या शिवाय लोकप्रतिनिधींना भेटून दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे.

वकील संघटनेचे माजी अध्यक्ष माणिकराव पवार म्हणाले, सरकारने  सामान्य माणसाला न्याय महाग करून ठेवला आहे.  सुनावणीस मुदत वाढ किंवा सुनावणीस लागणारी आवश्यक कागदपत्रे दाखल करताना त्याला मर्यादा येणार आहेत. कारण मुदतवाढीच्या अर्जाला पूर्वी 10 रुपयांचे तिकीट लागत होते. आता ते 50 रुपयांचे लागणार आहे. त्याशिवाय प्रत्येक कागदासाठी 5 ऐवजी 25 रुपयांचे तिकीट लागणार आहे.

अ‍ॅड. सुरेश भोसले म्हणाले,  कोर्ट फी तिकिटात केलेल्या पाचपट वाढीचा सरकारने पुनर्विचार करण्याची गरज आहे. भूमीसंपादनाच्या दाव्याबाबत जर एखादा शेतकरी आला तर त्याला नव्या वाढीने किती रुपये भरायला लागतील, याचा विचारच न केलेला बरा. रोजगार बुडवून कामांसाठी न्यायालयात येणार्‍यांना ही रक्कम मोठी वाटणार आहे. खरेतर गोरगरीब पक्षकारांचा विचार करुन शासनाने आहे या स्टॅप ड्युटीतही कपात करणे अपेक्षित होते. मात्र त्याऐवजी झालेली दरवाढ अन्याय आहे. 

अ‍ॅड. एस. एम. यादव म्हणाले,  न्यायालयात केल्या जाणार्‍या विविध अर्जांसाठीही ही फी आकारली जाणार आहे. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया किचकट होणार आहे. त्याशिवाय या वाढीमुळे दलाली आणि मध्यस्थी करणार्‍यांची संख्या वाढण्याचीही भीती आहे. त्यामुळे पक्षकारांची लूट होऊ शकते. शासनाने वाढवलेली स्टॅम्प ड्युटी तातडीने कमी करून सामान्य जनतेला दिलासा देण्याची गरज आहे.