Mon, May 20, 2019 23:00होमपेज › Sangli › सांगलीत ५५ ट्रॅक्टर, स्पेअर पार्ट जप्त

सांगलीत ५५ ट्रॅक्टर, स्पेअर पार्ट जप्त

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 10:47PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील शामरावनगर येथील झुलेलाल मंदिराजवळ एका रिकाम्या जागेत असणारे सुमारे 55 ट्रॅक्टर तसेच कोल्हापूर रस्त्यावरील शिवराजनगर येथे हजारो टन स्पेअर पार्ट असा लाखो रूपयांचा मुद्देमाल शुक्रवारी जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आणि स्पेअर पार्ट ठेवल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजन माने यांनी दिली. 

शशि दयानंद चौधरी (वय 50, रा. कोल्हापूर रस्ता, शिवराजनगर, सांगली) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. शामरावनगर येथे एका रिकाम्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर असल्याची माहिती निरीक्षक माने यांना खबर्‍याद्वारे मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकासह शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी तेथे सुमारे 25 ट्रॅक्टर आढळून आले. तर दुसर्‍या एका गोदामात 30 ट्रॅक्टर सापडले. त्यातील काही नवीन तर काही सडलेल्या स्थितीत आहेत. 

याबाबत चौकशी केल्यानंतर ते शशि चौधरीच्या मालकीचे असल्याचे समजले. त्यानंतर चौधरीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. मात्र चौकशीदरम्यान त्याच्या घराजवळही ट्रॅक्टरचे तीन कंटेनर भरून स्पेअर पार्ट असल्याची माहितीही मिळाली. त्यानंतर दुसरे पथक त्याठिकाणी पाठविण्यात आले. मात्र रात्री उशीर झाल्याने त्याची मोजदाद शक्य नसल्याने पोलिसांनी ती जप्त केली आहेत. 

यावेळी चौधरीकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यालाही या वाहनांची कागदपत्रे देणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसांचा संशय बळवला आहे. शिवाय त्याने ही सर्व वाहने लिलावात घेतल्याचे सांगितले आहे. मात्र त्याबाबतची कागदपत्रे देण्यासही तो असमर्थ ठरला आहे. त्यामुळे पोलिस ताच्याकडे कसून तपास करीत आहेत. सध्या केवळ वाहने जप्त केली असून पूर्ण चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे निरीक्षक राजन माने यांनी सांगितले. 

निरीक्षक माने यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, सागर पाटील, अशोक डगळे,  अमित परीट, शशिकांत जाधव, सचिन कनप, चेतन महाजन, अझर पिरजादे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.