Tue, Jul 16, 2019 09:37होमपेज › Sangli › औद्योगिक क्रांतीद्वारे सांगली पुण्याशी स्पर्धा करेल

औद्योगिक क्रांतीद्वारे सांगली पुण्याशी स्पर्धा करेल

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 10:24PMसांगली : प्रतिनिधी

 ‘सांगली फर्स्ट’सारख्या चळवळीच्या संकल्पनेतून जिल्ह्यात औद्योगिक क्रांती घडेल.  सांगली पुण्यासारख्या शहरांशी स्पर्धा करेल, असे मत केंद्रीय रेल्वे व दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी व्यक्‍त केले. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘सांगली फर्स्ट’ प्रदर्शनाचे त्यांच्याहस्ते उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, संयोजक खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सुमनताई पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, आयुक्‍त रवींद्र खेबुडकर, डॉ. जी. व्ही. परिश्‍वाड, शेखर इनामदार, शेखर माने, श्रीनिवास पाटील आदी उपस्थित होते. सांगली, मिरज कोल्हापूर आंत्रप्रुनर्स फोरम आणि क्रेडाई यांच्या माध्यमातून हे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे. 

 सिन्हा  म्हणाले, साधनसंपन्नता असूनही जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही. आता खासदार पाटील यांनी पुढाकार घेऊन स्टार्टअपच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. यातून स्थानिक रोजगार वाढेल. शेतीचा  आणि कृषीपूरक उद्योगांचाही विकास होईल.

ते म्हणाले, खासदार पाटील यांनी पाठपुरावा करून रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, चार राष्ट्रीय महामार्ग आणि ड्रायपोर्टच्या माध्यमातून विकासाचा महामार्ग खुला केला आहे.  यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योग सांगली जिल्ह्यात येतील. त्यासाठी त्यांना सरकार मदत करेल.

ना.चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी पुढे यावे यासाठी  खासदार पाटील यांनी मोट बांधली आहे. यातूनच सांगलीचा खुंटलेला विकास गतिमान होईल.ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा निर्णय सरकार घेईलच. पण आर्थिक मागास मराठा समाजातील तरुणांना विविध कोर्सेसचे प्रशिक्षण  सरकार मोफत देणार आहे. उद्योग निर्मितीसाठी 10 लाखांचे कर्ज देईल. त्याचे व्याज सरकार भरेल. यातून नवउद्योजक आणि रोजगार निर्माते बनतील. 

खासदार पाटील म्हणाले, सांगली फर्स्ट हा उपक्रम जिल्ह्याला पुढे नेण्यासाठीचा अराजकीय प्रयत्न आहे. हे प्रदर्शन केवळ दोन-तीन दिवसांचा इव्हेंट नव्हे; तर  औद्योगिक विकासाची चळवळच आहे. यात तीन दिवसात मोठ्या उद्योजकांसोबत चर्चा होतील. त्याचे परिणाम येत्या काळात निश्चितपणे दिसतील.  सांगली जिल्ह्यासाठी  श्री. सिन्हा यांनी मोठे उद्योग द्यावेत.

दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी स्वागत केले. श्रीमंत गोपाळराजे पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.  क्रेडाईचे अध्यक्ष विकास लागू यांनी आभार मानले. त्यांनी अडचणीतील बांधकाम व्यवायाला यावर्षी रेडीरेकनचे दर वाढवू अडचणीत आणू नका, अशी विनंती ना. पाटील यांना केली.