होमपेज › Sangli › निवृत्त कामगारांचा प्रश्‍न चर्चेतून सोडवू 

निवृत्त कामगारांचा प्रश्‍न चर्चेतून सोडवू 

Published On: Dec 30 2017 12:44AM | Last Updated: Dec 29 2017 9:09PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

वसंतदादा साखर कारखान्यातील निवृत्त कामगारांनी आपल्या मागण्यासंदर्भात स्टेशन चौकातील वसंतदादांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केले.   कामगार आल्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी कारखान्याचे  अध्यक्ष विशाल पाटील  आले. तुमचे प्रश्‍न सोडवण्यासाठी  मध्यस्थी करण्यास तयार आहे. चर्चेतून मार्ग काढूया, असे आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन सहा जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आले. 

कारखान्यातील निवृत्त झालेल्या सुमारे आठशे कामगारांचे तीस कोटी रुपये कारखान्याकडून येेणे आहे. ही सर्व रक्कम मिळावी यासाठी अ‍ॅड. के. डी. शिंदे यांच्यासह कारखान्याच्या निवृत्त कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर या कामगारलांना  नोटिसा काढण्यात आल्या. त्यामुळे निवृत्त कामगारांनी कारखान्यासमोरच या नोटिसीची होळी केली. त्यानंतर शुक्रवारी वसंतदादांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार  शिंदे यांच्यासह, घन:शाम पाटील, श्रीकांत देसाई, विष्णू माळी आदींसह दोनशेवर कामगार आले.  काही वेळातच अध्यक्ष पाटील त्या ठिकाणी आले.  पाटील म्हणाले,  कामगारांचे प्रश्‍न सुटण्यासाठीच कारखाना भाडेतत्वावर दिला आहे. कारखाना चालला तर सर्वाचे पैसे मिळणार आहेत. कारखाना चालू नये, यासाठी काहीजण राजकीय षडयंत्र आखत आहेत. प्रश्‍न सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यास माझी तयारी आहे.  

अ‍ॅड. शिंदे म्हणाले,   समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. वैयक्तीक कामगार भेटण्यास गेल्यानंतर 30 टक्के कपात करून रक्कम घेण्यास सांगितले जाते. शेतकरी संघटनेकडे गेल्यास  15 टक्के कपात करण्यास सांगण्यात येते. मात्र निवृत्त कामगार एक रुपयाही कमी घेणार नाहीत. कारखान्याची मालमत्ता विक्री करून कामगारांची देणी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.