Sat, Nov 17, 2018 18:28होमपेज › Sangli › थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत पोलिस बंदोबस्त

थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत पोलिस बंदोबस्त

Published On: Dec 30 2017 12:44AM | Last Updated: Dec 29 2017 9:00PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

थर्टी फर्स्ट अर्थात वर्षाअखेरीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दल सज्ज झाले आहे. नववर्षाचे स्वागत करायला सर्वजण उत्सुक असताना या जल्लोषात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दलातर्फे या दिवशी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच रविवारी रात्री जिल्ह्यात ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह विरोधी मोहिमेसह विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिली.  

थर्टी फर्स्टला उत्साहाच्या भरात कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस दलाने विशेष खबरदारी घेतली आहे. त्यादिवशी रात्री पहाटेपर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्याशिवाय ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधी मोहीमही सुरू ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातही बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात  विविध ठिकाणी नाकाबंदीही सुरू करण्यात आली आहे.      
वर्षाअखेर साजरा करताना दारू पिऊन अनेकजण बेदरकारपणे वाहन चालविताना आढळून येत असल्याने अशा तळीरामांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून विशेष पावले उचलली आहेत. तसेच यावेळी कोठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठीही विशेष वॉच ठेवण्यात येणार आहे. दारू पिऊन वाहन चालवून होणार्‍या अपघातात अनेक निष्पापांना इजा होते. त्यामुळे तळीरामांना चाप लावण्यासाठी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधी मोहीम 31 डिसेंबरलाही राबविण्यात येणार आहे. सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घालणार्‍या तळीरामांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईत सापडणार्‍यांच्या गाड्या, वाहन चालविण्याचा परवाना जप्त करण्यात येणार आहे. त्याशिवाय गाड्यांचे रजिस्ट्रेशन आणि परवाना रद्द करण्यात येणार आहे.       

बंदोबस्तावेळी सापडणार्‍या तळीरामांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्राद्वारे ज्या त्या आरोग्य केंद्रात सक्षम वैद्यकीय अधिकारी उपस्थित ठेवण्यास पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.     या दिवशी रात्रभर पोलिसांची संवेदनशील भागात गस्तही राहणार आहे. मोठ्या आवाजात स्पीकर लावल्यासही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.