Wed, Aug 21, 2019 02:12होमपेज › Sangli › खड्डेमुक्‍तीबाबत न्यायालयाचीही फसवणूक

खड्डेमुक्‍तीबाबत न्यायालयाचीही फसवणूक

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 10:39PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील सर्व रस्ते डिसेंबर 2017 अखेर खड्डेमुक्‍त करू, असे महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. परंतु शहरातील खड्डे काही हटले नाहीत, असा आरोप सदस्य प्रशांत पाटील यांच्यासह सदस्यांनी गुरुवारी स्थायी समिती सभेत केला. जनतेला फसवताच, पण लेखी देऊनही न्यायालयाचीही फसवणूक केल्याचा संताप त्यांनी व्यक्‍त केला. शहर खड्डेमुक्‍त कधी होणार? असा जाबही त्यांनी विचारला.

सभापती बसवेश्‍वर सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. शहरातील खराब रस्ते आणि खड्ड्यांवरून सदस्यांनी प्रशासनाचा पंचनामा केला. एकीकडे 24 कोटी, 33 कोटी रुपयांचे रस्ते मंजूर झाले आहेत, कामे सुरू आहेत असे सांगितले जाते. मात्र अनेक रस्ते खड्ड्यांत आहेत. त्याचे पॅचवर्क करण्याबाबत निविदाही काढल्या. पण त्यातील केवळ प्रभाग एक व समिती दोनचेच टेंडर निश्‍चित झाले आहे. तेथे कामे सुरू आहेत. उर्वरित समिती तीन व चारचे टेंडर निश्‍चित  नाही. ती कामे कधी होणार? जनतेला व न्यायालयालाही फसवून प्रशासन सुस्तच आहे. याप्रकरणी श्री. सातपुते यांनी तत्काळ पुढील सभेत अहवाल देण्याचे आदेश दिले. 

दिलीप पाटील म्हणाले, कर्मचार्‍यांची बायोमेट्रिक हजेरी चालू केली नाही. भागात कामे सुरू असल्याच्या, पाहणीच्या नावे अधिकारी, कमर्र्चारी जागेवर नसतात. यामुळे बायोमेट्रीक हजेरी सुरू झाली पाहिजे. याबाबत प्रशासनाला विचारले तर आधारकार्ड गोळा करायचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. मानधनावरील कर्मचार्‍यांनी आधारकार्ड दिले. बायोमेट्रिक हजेरीला त्यांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र अधिकारीच व कायम कर्मचारी आधारकार्ड देत नाहीत. या हजेरीला प्रतिसाद न देता टाळाटाळ करीत आहेत. यावर श्री. सातपुते यांनी तत्काळ अशा अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाईचे आदेश दिले. 

शहरातील चरखोदाई रोखण्याचे आदेश स्थायी समिती सभेत देण्यात आले होते. तरीही खोदाई सुरूच असल्याचा आरोप सदस्यांनी केला. याबाबत दिलीप पाटील म्हणाले, नगरसेवक सभेत तक्रारी करतात. पण त्यावर उपाययोजना होत नाहीत. अधिकारी जागेवर जावूून पाहणी करीत नाही. अशा अधिकार्‍यांचा काय उपयोग? यावर श्री. सातपुते यांनी अधिकार्‍यांना अशा बेकायदा चर खोदाईबद्दल सक्‍त कारवाईचे आदेश दिले.