Sat, Mar 23, 2019 01:57होमपेज › Sangli › सांगलीत युवकावर खुनीहल्ला

सांगलीत युवकावर खुनीहल्ला

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:37PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील संजयनगर येथील लव्हली सर्कल परिसरात पूर्ववैमनस्यातून एका युवकावर तलवारीने खुनी हल्ला करण्यात आला. रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. युवकाच्या डोळ्यात चटणी टाकून त्याच्या डोक्यात बांबूने मारहाण करून पाठीवर तलवारीने वार करण्यात आले. याप्रकरणी मिरजेच्या दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा संजयनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

नजीर नुरूद्दीन रोहिले (वय 26, रा. खोतनगर, मिरज) व एक अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रकाश धोंडीराम माळी (वय 30, रा. बामणोली) याने फिर्याद दिली आहे. प्रकाश आणि नजीरमध्ये जागेच्या कारणावरून पूर्वीपासून वाद आहे. तो वाद न्यायप्रविष्ठ आहे. त्या वादातून प्रकाशने 2016 मध्ये नजीरच्या वडिलांना बांबूने बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी त्याच्यावर मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. 

त्या भांडणाचा राग मनात धरून रविवारी रात्री नजीर एका साथीदारासमवेत मोटारसायकलवरून सांगलीत आला. संजयनगरमधील लव्हली सर्कलजवळ त्याने प्रकाशच्या गाडीच्या आडवी मोटारसायकल मारली. त्यानंतर त्याला खाली पाडून त्याच्या डोळ्यात चटणी टाकली. त्यानंतर नजीरने त्याच्या पाठीवर तलवारीने वार केले तर साथीदाराने प्रकाशच्या डोक्यात बांबू घातला. 

प्रकाशवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी सोमवारी दोघांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा संजनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदेवे करीत आहेत.