Mon, May 20, 2019 20:07होमपेज › Sangli › आरक्षणाचा बाजार; आजची महासभा गाजणार

आरक्षणाचा बाजार; आजची महासभा गाजणार

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:15PMसांगली : प्रतिनिधी

खुले भूखंड खासगी संस्थांना भाड्याने देण्याचे विषय मंगळवारी (दि. 20) होणार्‍या महासभेसमोर ठेवण्यात आले आहेत. यासाठी गेल्या महिन्यात झालेल्या महासभेचा आधार घेतला आहे. त्यामध्ये उपसूचनेव्दारे 25 जागांवरील आरक्षण उठविण्याचा ऐनवेळाचा ठराव करण्यात आला आहे. या विषयाला राष्ट्रवादीने विरोधाची भूमिका घेतली आहे. उपमहापौर गट विरोधात आहेच. त्यामुळे ही महासभा चांगलीच गाजणार हे स्पष्ट आहे. 

महापौर हारुण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11.30 वाजता ही महासभा होणार आहे. यामध्ये महापालिकेत कुपवाड येथील सिटी सर्व्हे नंबर 3630 मधील 1289.70 चौरस मीटरची खुली जागा आभाळमाया फौंडेशनला देण्यात येणार आहे. त्यासाठी नगररचना विभागाने वार्षिक चाळीस हजार रूपये भाडे निश्‍चित केले आहे. या विषयाला मान्यता देण्याचा प्रस्ताव महासभेच्या अजेंड्यावर आहे. यापूर्वी महापालिकेच्या खुल्या जागा खासगी संस्थांना देण्याचा प्रस्ताव महासभेत आला होता. त्यांना नामात्र भाडे आकारणीचा यात समावेश होता. 

मात्र या विषयावरून महासभेत गदारोळ झाला होता. त्यामुळे जागा भाड्याने देवू नयेत व यापूर्वी दिलेल्या जागा ताब्यात घ्याव्यात, असा निर्णय झाला होता. तरी देखील पुन्हा खासगी संस्थांना जागा भाड्याने देण्याचा विषय सभेत पुन्हा महासभेसमोर आणला आहे. काही सदस्यांनी तर यापूर्वी या संस्थेला ही जागा वापरासाठी दिली असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हा विषय गाजण्याची शक्यता आहे. 

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाला अभ्यासिका, वाचनालय व गुणवत्तावाढीसाठी सर्व्हे क्रमांक 367 (ब) ची इमारत भाडेतत्वावर देणे व त्याचे भाडेनिश्‍चित करण्याचा विषय महासभेच्या विषयपत्रिकेवर आहे.  परंतु या जागेची मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्षा सौ. नीता केळकर यांनी देखील त्यांच्या संस्थेसाठी केली आहे. त्यामुळे या विषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. 

मिरज विद्यानगर येथील बॉटनिकल गार्डन तयार करण्यासाठी व दैनंदिन या गार्डचे देखभाल करण्यासाठी बल्लारी चॅरिटेबल ट्रस्टला तीन वर्षांसाठी मनपाची जागा देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या या जागा खासगी संस्थांना भाड्याने देण्याच्या विषयावरून महासभा गाजण्याची शक्यता आहे.

खणभाग येथील सिटी सर्व्हे नंबर 1/28/ब/1 मंजूर विकास योजनेमधील आरक्षण क्रमांक 220 मधील अंशता बाधीत होणार्‍या जागेवरील आरक्षण वगळण्याचा विषय महासभेत आला आहे. याला राष्ट्रवादीचा विरोध आहे. शिवाय जानेवारी महिन्यातील महासभेत अजेंड्यावर आलेल्या भूखंडावरील आरक्षण उठविण्याचा निर्णय झाला होता. मात्र महापौरांनी प्रशासनाचे विषयपत्र नसताना नगरसेवकांच्या उपसूचनेव्दारे 25 जागांवरील आरक्षण उठविण्याचा ठराव ऐनवेळी केला आहे. याला राष्ट्रवादीचा विरोध होण्याची शक्यता 
आहे.