Tue, Jul 16, 2019 22:41होमपेज › Sangli › महावितरण कार्यालयात कर्मचार्‍यावर चाकूहल्ला

महावितरण कार्यालयात कर्मचार्‍यावर चाकूहल्ला

Published On: Aug 29 2018 1:29AM | Last Updated: Aug 29 2018 12:20AMसांगली : प्रतिनिधी

खंडित झालेला वीजपुरवठा सुरू करण्यासाठी शहरातील खणभागातील महावितरणच्या कार्यालयात घुसून एका कर्मचार्‍यावर चाकूहल्ला करण्यात आला. यामध्ये श्रेयस प्रवीणकुमार शहा (22, रा. सांगलीवाडी) जखमी झाला आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चौघांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

साहिल मुल्ला व तीन अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. श्रेयस शहा हे खणभागातील कार्यालयात विद्युत सहायक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी काम संपल्यानंतर सायंकाळी पाच वाजता ते घरी निघाले होते. त्यावेळी अन्य कर्मचारी गैरहजर असल्याने पुढील शिफ्टचे कामही करावे, असे लाइनमन प्रफुल्ल श्रीरामे यांनी सांगितले. त्यामुळे शहा कार्यालयातच थांबले होते.  खणभागातील मकान गल्लीत राहणार्‍या अल्लाबक्ष अमीन मुल्ला यांनी त्यांच्या घरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याची तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार शहा हे मदतनीस प्रसाद व्हसवाडे यांना घेऊन मुल्ला यांच्या घरी गेले. तेथे मीटरची तपासणी केल्यानंतर पथदिवे सुरू असल्याने आता दुरूस्तीचे काम होणार नाही, असे सांगून दोघेही निघून आले. रात्री नऊच्या सुमारास साहिल मुल्ला व त्याचे आठ साथीदार शहा यांचा शोध घेत महावितरणच्या कार्यालयात गेले. 

त्यावेळी साहिलने शहा यांना वीजपुरवठा सुरू न केल्याबद्दल  दमदाटी केली. त्यांना मारहाणही करण्यात आली. त्यानंतर साहिलने चाकूने यांच्यावर हल्ला केला. अन्य तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यात शहा यांच्या कपाळावर, नाकावर गंभीर दुखापत झाली आहे. 

कार्यालयातील कर्मचार्‍यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हल्लेखोर निघून गेले. शहा यांच्यावर सुरूवातीला शासकीय रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले नंतर त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चौघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.