होमपेज › Sangli › वर्षानुवर्षे भ्रष्टाचार करणारे, कमळ फुलवणारे दरोडेखोर तुमच्याकडेच

वर्षानुवर्षे भ्रष्टाचार करणारे, कमळ फुलवणारे दरोडेखोर तुमच्याकडेच

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 10:38PMसांगली : प्रतिनिधी

काँग्रेस- राष्ट्रवादीला दरोडेखोर म्हणणार्‍या भाजप नेत्या खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या व्यासपीठावरील लोक तपासावेत. वर्षानुवर्षे भ्रष्टाचार करणारे आणि नंतर कमळ फुलविणारे तुमच्याच व्यासपीठावर आहेत, असा टोला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी लगावला. ते म्हणाले, सांगली, मिरज आणि महापालिकेचा पुळका आताच भाजपला कसा आला? निवडणुका आल्या की भाजपला जाग येते. 

ते म्हणाले,युवा संवाद परिषदेच्या निमित्ताने खासदार महाजन यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्याचा पाटील यांनी समाचार घेतला. ते म्हणाले,  दरोडे घालूनही नामानिराळे राहिलेले  गेली चार वर्षे तुमच्याच पक्षात आहेत. 

ते म्हणाले, खोटे बोलून भाजप सत्तेवर आला आहे. परंतु चार वर्षांत किती आश्‍वासने पाळली? युवा परिषद घेणार्‍यांनी किती युवकांना रोजगार दिले?  ‘न खाऊंगा, न खाने दूँगा’च्या वल्गना करणार्‍या भाजपने ललित मोदी  आणि शहा पुत्रांची चौकशी का केली नाही? हे दरोडेखोर कोणाचे होते? बँकेवर दरोडा घालणार्‍या नीरव मोदीच्या प्रकरणाला जबाबदार कोण? हाच का तुमचा पारदर्शक कारभार? लोकप्रतिनिधींचे पीए महापालिकेचे ठेकेदार आहेत. असे असूनही आपले पाप लपविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीवर आरोप करीत आहेत.ते म्हणाले, गेल्या चार वर्षांत तुम्ही सांगलीसह जिल्ह्याला काय दिले?  आता पुन्हा महापालिका आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच यांना जाग आली आहे. निवडणुकीत तुम्हाला उमेदवार  मिळणार नाहीत.