Thu, Apr 25, 2019 21:26होमपेज › Sangli › बेदाणा, मका घसरला; गूळ दर टिकून

बेदाणा, मका घसरला; गूळ दर टिकून

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 13 2018 10:59PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

सांगली मार्केट यार्डात बेदाण्याचा दर घसरला आहे. आवक वाढल्याने दरात किलोला पाच ते सात रुपयांनी घसरण झाली आहे. मक्याचा दरही घसरला आहे. गुळाचे दर मात्र टिकून आहेत. नवीन हळदीच्या आवकेकडे लक्ष लागले आहे. नवीन हळदीच्या शुभारंभाचा सौदा दि. 22 जानेवारीला होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

सांगली मार्केट यार्डात बेदाणा आवक व दरात वाढ झाली होती. सांगलीत बुधवारी सौद्यात 600 टन आवक होती. शुक्रवारीही आवक मोठी होती. तासगाव येथील सौद्यातही 500 टन आवक होती. नवीन बेदाण्याची आवक सुरू झाली आहे. जुना बेदाणाही मार्केटमध्ये येत आहे. त्यामुळे वाढलेल्या दरात पाच ते सात रुपयांची घसरण झाली आहे. हिरव्या बेदाण्याचा किलोचा दर 125 ते 165 रुपये, पिवळ्या बेदाण्याचा दर किलोला 140 ते 180 रुपये आहे. 

गुळाचे दर टिकून आहेत. गुळाचा क्विंटलचा भाव 3 हजार ते 3 हजार 400 रुपये आहे. दराच्या प्रतिक्षेत गुळाच्या आवकेवर थोडा परिणाम झाला आहे. दोन-तीन महिने गुळ दरात वाढ होणार नसल्याचा अंदाज काहींनी व्यक्त केला. हळदीचे क्विंटलचे भाव 7 हजार ते 10 हजार रुपये आहेत. यार्डात रोज अडीच हजार क्विंटल हळदीची आवक होत आहे. नवीन हळदीच्या आवक जानेवारीत सुरू होत असते. त्यानुसार आवकेस सुरूवात झाली आहे. नवीन सिझनमधील हळदीच्या शुभारंभाचा सौदा दि. 22 जानेवारी रोजी होणार आहे. सांगलीत नवीन आवक होणार्‍या हळदीकडे लक्ष लागले आहे. 

मक्याचा हमीभाव 1425; बाजारात दर 1250 रुपये
मक्याचा हमीभाव क्विंटला 1 हजार 425 रुपये आहे. पण प्रत्यक्षात बाजारात मक्याचा भाव 1 हजार 250 रुपये आहे. शेतकर्‍यांना क्विंटलला 175 रुपये फटका बसत आहे. हमीभावाने खरेदी केंद्राअभावी शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. बाजारात मिळेल त्या दराने शेतकरी मक्याची विक्री करत आहेत.