Sat, Aug 24, 2019 21:45होमपेज › Sangli › सांगलीत मंडप पाडल्याने उपोषणकर्ता जखमी

सांगलीत मंडप पाडल्याने उपोषणकर्ता जखमी

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 10:42PMसांगली : प्रतिनिधी

येथील हनुमाननगरातील प्रभाग क्रमांक 32 मध्ये नागरी समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते शहाजी भोसले यांनी दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. परंतु मनपा ठेकेदाराने तो मंडप शुक्रवारी जेसीबीने जमीनदोस्त केला. यावेळी धक्का लागून भोसले जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी उपोषण सुरूच ठेवले. 

हनुमानगरात ड्रेनेज खोदाईने रस्ते खराब झाले आहेत. अपुरा पाणीपुरवठा, ड्रेनेज योजनेचे काम ठप्प असूनही जलनि:स्सारण केंद्राला महापालिकेने मुदतवाढ दिली आहे. ती होण्यासंदर्भात पाठपुरावा करूनही दखल घेतलेली नाही. त्यामुळे भोसले यांनी गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. परंतु ठेकेदाराच्या दबावाने कर्मचार्‍यांनी तेथे घातलेला मंडप जेसीबीने जमीनदोस्त केला. यात उपोषणकर्ते भोसले यांच्या छातीला मुका मार लागला. याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी धावले.

पोलिसांनी भोसले यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र भोसले यांनी त्याच अवस्थेत उपोषण सुरू ठेवले.  या घटनेनंतर हनुमानगर,त्रिमुर्ती कॉलनी परिसरात तणाव निर्माण झाला होता.