Thu, May 23, 2019 04:36होमपेज › Sangli › तासगाव पूर्व भागाला वादळी पावसाचा तडाखा

तासगाव पूर्व भागाला वादळी पावसाचा तडाखा

Published On: May 17 2018 6:45PM | Last Updated: May 17 2018 6:45PMमांजर्डे : वार्ताहार

 तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील आरवडे  हातनूर ,डोर्ली,लोढे,पुणदी,विसापूर,हातणोली,धामणी,गोटेवाडी या गावांना आज वादळी पावसाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. या गावात जोरदार वारा व विजांच्या कड़कडाटासह गारांचा पाऊस पडला. या पावसामुळे द्राक्ष व डाळींबाचे मोठ्‍या प्रमाणात नुकसान झाले आहे.

उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास पडलेल्या जोरदार पावसामुळे काहिसा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेतीच्या मशागतींना लाभ होणार आहे. या जोरदार झालेल्‍या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे याचा वाहतुकीवर परिणाम झाला. ही झाडे जे.सी.बी च्या सहाय्याने बाजूला करून वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यात आला.

घरांचे नुकसान

जोरदार वाऱ्यामुळे हातनूर येथील बाळू फाळके यांचे घर पडले असून, घरावरील पत्र्याचे छत सुमारे 300 फूट अंतरावर उडून जाऊन पडले आहे, तर गोटेवाडी येथील संपतराव लेंगरे यांच्या जनावरांच्या गोट्याचेही छत उडून गेले आहे. त्‍यातबरोबर अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. जोरदार वार्‍यामुळे विजेच्या तारा तुटल्याच्या घटना घडल्‍या आहेत. यामुळे या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

द्राक्ष आणि डाळींब उत्पादकांना मोठा फटका

आजच्या पावसामुळे या भागातील द्राक्ष ,डाळिंब उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. गारा व जोरदार वाऱ्यामुळे द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्षांच्या काड्या मोडल्या असून आंब्याचे सुद्धा नुकसान झाले आहे. या भागातील 200 एकर फळबागेचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.कृषी विभागाच्या वतीने याचे पंचनामे सुरू केले आहेत.