Thu, Apr 25, 2019 15:28होमपेज › Sangli › लिंगायत महामोर्चाचा उद्या एल्गार

लिंगायत महामोर्चाचा उद्या एल्गार

Published On: Dec 01 2017 11:47PM | Last Updated: Dec 01 2017 11:22PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्यावतीने पश्‍चिम महाराष्ट्राचा लिंगायत महामोर्चाद्वारे एल्गार पुकारला आहे. त्याला सर्वपक्षीय, संघटना, समाजाने पाठिंबा दिला आहे. किमान 5 लाख समाजबांधव रविवारी रस्त्यावर उतरणार असल्याचे समन्वय समितीचे सुधीर सिंहासने, प्रदीप वाले, विश्‍वनाथ मिरजकर यांनी सांगितले. 

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य  या महामोर्चाचे नेतृत्व करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या महामेळाव्यास देशभरातील लिंगायत समाजाचे सर्व पीठांचे जगद्गुरू उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने पुन्हा एकदा सांगलीत भगवे वादळ उठणार असल्याचे ते म्हणाले.

वाले म्हणाले, गेल्या 2012 मध्ये समाजाचे नेते (कै.) विजय सगरे यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत धर्ममान्यतेसाठी चळवळ सुरू झाली.  सांगली, कराड येथे आंदोलने झाली. तेव्हापासून हे आंदोलन सुरूच आहे. आता लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठी देशभरात आंदोलने सुरू आहेत. याअंतर्गत पश्‍चिम महाराष्ट्राचा आवाज राज्य आणि केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हा एल्गार आहे. शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले  आहे.

सिंहासने, मिरजकर म्हणाले, या मोर्चात सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, उत्तर कर्नाटकातील लाखो बांधव सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील सर्वपक्षीय सुमारे अडीच लाखांहून अधिक बांधव उतरतील. त्यासाठी पोलिस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनानेही चोख व्यवस्था केली आहे. 

पार्किंग व्यवस्था

मिरजमार्गे येणार्‍या सर्वच जिल्हा, तालुक्याच्या वाहनांसाठी संजय भोकरे कॉलेज, चिंतामण, विलिंग्डन महाविद्यालय, भारती विद्यापीठाजवळील ‘वॉन्लेस’चे मैदान येथे पार्किंग व्यवस्था आहे. कुपवाड, माधवनगरसह सर्व वाहनांसाठी सह्याद्रीनगर, मार्केट यार्ड येथे पार्किंग व्यवस्था आहे. कोल्हापूरमार्गे येणार्‍या सर्व वाहनांसाठी 100 फुटी रस्ता, नेमीनाथनगर ग्राऊंड येथे पार्किंगव्यवस्था आहे. या मेळाव्यासाठी सुमारे पाच हजारांहून  अधिक स्वयंसेवक राबत आहेत.  यावेळी सुशील हडदरे, अशोक पाटील, विनायक शेटे, प्रदीप दडगे, नगरसेवक शिवराज बोळाज, डी. के. चौगुले, रविंद्र केंपवाडे, संजीव पट्टणशेट्टी, प्रदीप पाटील, सतीश मगदूम, दिलीप देसाई  उपस्थित होते.