Sun, Nov 17, 2019 08:12होमपेज › Sangli › नेत्यांनी आयात साखरेची भीती घालू नये

नेत्यांनी आयात साखरेची भीती घालू नये

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 8:51PMसांगली : प्रतिनिधी

आगामी हंगामात जागतिक बाजारात बंपर उत्पादनामुळे साखरेची मोठी आवक होणार आहे. त्यामुळे आता कोणी आयात साखरेची भीती घालून   ऊस उत्पादकांची दिशाभूल  करु नये, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी केले. जागतिक बाजारापेक्षा सध्या भारतातील साखरेचे दर कमी आहेत. त्यामुळे साखरेची आयात महाग होणार असल्याचे ते म्हणाले. 

याबाबतच्या निवेदनात कोले यांनी स्पष्ट केले आहे की, गेल्या गळीत हंगामात देशात 202 लाख  टन साखरेचे उत्पादन झाले होते.  त्यावेळी देशात 40 लाख  टन साखर शिल्लक होती. तेव्हा   8 लाख  टन साखर आयात करून देशांतर्गत गरज भागवली गेली.  तर त्यावेळी साखरेचा प्रतिक्विंटलचा सरासरी दर हा 3400 ते 3500 रूपये होता. 

कोले म्हणाले, या हंगामात मात्र चित्र बदलले आहे. गतवर्षाच्या तुलनेत  2017-18 च्या हंगामात 50 ते 55  लाख टन साखरेचे उत्पादन अतिरिक्‍त होणार आहे.  शिवाय गत हंगामातील 40 लाख टन साखर शिल्लक आहे. म्हणजे देशात 290 लाख ते 285 लाख टन साखर उपलब्ध असेल.  तर आता नवीन ऊस लागवड वाढल्याने  सन 2019-20 च्या हंगामात मात्र साखरेचे बंपर उत्पादन होणार हे आताच स्पष्ट आहे. 

ते म्हणाले, देशातातील दरापेक्षा जागतिक बाजारात साखरेचे दर कमी आहेत. त्यामुळे अनुदानाशिवाय निर्यात परवडणार नाही. तर दुसरीकडे साखरेचा दर गेल्या दोन महिन्यात  प्रतिक्‍विंटल 400 ते 500 रूपयांनी घसरला आहे.  आता तर साखर 3,100 ते 3,200 रू. दरम्यान आहे.   याचवेळी पाकिस्तानने सुमारे 15 लाख टन साखर निर्यात करण्याची घोषणा केली आहे. ऑक्टोबर, 2017 मध्ये  पंजाबमधील एका व्यापार्‍याने पाकिस्तानातून 2 हजार टन साखर आयात केली होती. त्यावेळी  साखरेचे   दर 4 हजार रूपये प्रती क्विंटल होते. आयातीवर 50 टक्के  कर , जीएसटी  12 टक्के आहे.   पाकिस्तानच्या साखरेचा दर  प्रती क्‍विंटल 3060 रू. आहे. पाक सरकारने तेथे निर्यातीसाठी प्रती क्‍विंटल साखरेला 630 रू. अनुदान दिले आहे. त्यामुळे ती साखर 2,430 रू. किंमतीची होते. वाघा बॉर्डरपर्यंत वाहतूक 218 रू. मिळून 2648 रू. साखर होते. त्या साखरेला   50 टक्के आयातकर बसेल. त्यामुळे तिचा दर होईल 3,972 रू. त्यावर 18 टक्के जीएसटी म्हणजे  4,687 रू.च्या घरात साखर पोहोचते.  सध्या पंजाबात साखरेचा घाऊक बाजारातील दर 3,500 रू. आहे. ही 4687 रुपयांची साखर कोण घेणार, याचाच अर्थ साखरेच्या आयातीची भीती घालून तथाकथित शेतकरी नेत्यांनी दिशाभूल करु नये, असा टोला त्यांनी लगावला.