Sat, Mar 23, 2019 12:24होमपेज › Sangli › कुणबी दाखल्यासाठी समितीची नियुक्‍ती

कुणबी दाखल्यासाठी समितीची नियुक्‍ती

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 10:42PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

कुणबी-मराठा समाजाला ओबीसीचे दाखले मिळावे, अशी मागणी आहे. त्यांना तसा दाखला मिळावा यासाठी शोध समिती स्थापन करण्यात आली आहे. यावर लवकरच निर्णय होईल. मराठा समाजाच्या  अन्य मागण्यांवरही लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती  पालकमंत्री सुभाष देशमुख  यांनी दिली. 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने दि. 2 फेब्रुवारीस कर्जवाटप योजनेचा प्रारंभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अण्णासाहेब  पाटील विकास महामंडळाअंतर्गत मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. आमदार शिवाजीराव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, पालिकेतील भाजपचे पक्षप्रतोद विक्रम पाटील, राहुल महाडिक प्रमुख उपस्थित होते. 

ना. देशमुख म्हणाले,  समाजाच्या मागण्यांबाबत आघाडी सरकारच्या काळात ज्या चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली आहे. अहवाल तयार करून सर्व कायदेशीर बाबी तपासून मराठा समाजाच्या  मागण्यांवर लवकरच निर्णय घेण्यात येईल. नोकरीमध्ये 3 ते 4 टक्केच आरक्षण मिळते आहे. यामुळे सर्वांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे.  ते म्हणाले, केंद्र शासनाने कौशल्य विकास योजनेनुसार युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी 300 कोटी रुपये राज्याला दिले आहेत. मुद्रा योजनेमध्ये 50 हजार ते 10 लाखापर्यंत कर्ज सुविधा मिळण्याची सोय करण्यात आली आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला 200 कोटी रुपये दिले आहेत. या मंडळाअंतर्गत 18 ते 45 वर्षांपर्यंतच्या वयाच्या व्यक्तीला कर्ज मिळणार आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरात विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची सोय करण्यात येणार आहे. त्यासाठी 5 कोटींची तरतूद केली आहे. या  वसतीगृहात 500 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. तरूणांनी कष्टाची तयारी ठेवून व्यवसायाकडे वळले पाहिजे.

आमदार नाईक, जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, वैभव शिंदे, शिराळा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, माजी जि.प. सदस्य राहुल महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले.  तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, विजय कुंभार, राहुल  सूर्यवंशी, बाबा  सूर्यवंशी, नगरसेवक शकील सय्यद यांच्यासह नागरिक उपस्थित होते.  एस.के. पाटील यांनी आभार मानले.