Mon, Jun 17, 2019 03:14होमपेज › Sangli › तरुणावर चाकूहल्ला प्रकरणी एकास अटक 

तरुणावर चाकूहल्ला प्रकरणी एकास अटक 

Published On: Jan 17 2018 4:34PM | Last Updated: Jan 17 2018 4:32PM

बुकमार्क करा
कुपवाड : वार्ताहर

शहरातील ईश्वर तातोबा बंडगर (वय- ३५,रा.कापसे प्लॉट) या तरुणावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी  संशयित आरोपी ओंकार किशोर सगरे ( वय- 30, रा.शालिनीनगर, कुपवाड) याला कुपवाड पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जखमी ईश्वर बंडगर हा रविवारी (दि. 14) सकाळी साडेनऊच्या सुमारास अहिल्यानगर चौकातील एका पान पट्टीवर मावा खात थांबला होता. यावेळी संशयित ओंकार सगरे पानपट्टीजवळ येऊन ईश्वरची चेष्टामस्करी करत मावा खाण्यास मागू लागला. ईश्वरने त्याला मावा देण्यास नकार दिल्याने त्याने चिडून जाऊन ईश्वरला  शिवीगाळ करत खिशातील धारदार चाकू काढून ईश्वरवर चाकूहल्ला केला. 

यावेळी दोघांत बराचवेळ झटापटही झाली. ओंकार सगरेने ईश्वरच्या उजव्या खांद्यावर व पाठीवर दोन खोलवर चाकूचे वार केल्याने प्रचंड रक्तस्राव होऊन ईश्वर गंभीर जखमी झाला. ईश्वर गंभीर जखमी झाल्याचे दिसताच ओंकार सगरने पळ काढला. सकाळी-सकाळी चौकात दोन तरूणांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू असल्याची माहिती पसरताच घटनास्थळी बघ्यानी गर्दी केली होती. 

या घटनेची माहिती कुपवाड पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. जखमी ईश्वरला उपचारासाठी तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. संशयित ओंकार सगरेच्या विरोधात जखमी ईश्वर बंडगरने कुपवाड पोलिसात फिर्याद दिली होती. गुन्हा घडल्यानंतर  तीन दिवस फरारी असलेल्या संशयित ओंकार सगरेला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी शालिनीनगर परिसरात सापळा रचून मंगळवारी मध्यरात्री त्याला अटक केली.