Sat, Jan 19, 2019 04:08होमपेज › Sangli › सांगली जिल्ह्यातील विहीर गेली चोरीला (video) 

सांगली जिल्ह्यातील विहीर गेली चोरीला (video) 

Published On: Jan 22 2018 7:25PM | Last Updated: Jan 22 2018 7:33PMविटा : विजय लाळे

चोरीला दागिने जातात... पैसे जातात... अगदी वस्तूही जातात.... पण चक्क विहीर चोरीस गेल्याची कुणाची कैफियत असेल तर नवलच वाटेल ना... हो पण हे घडले आहे. म्हणतात ना.... सरकारी खातं अन दीड हात रितं.. असाच काहीसा प्रकार खानापूर तालुक्यात पहावयास मिळाला. अस्तित्वातच नसलेली विहीर चक्क महसूल विभागाने कागदावर दाखवली आहे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पहा ती विहीर कुठेच दिसत नाही, त्यामुळे महसूल विभागाने ही विहीर दाखवावी अन्यथा ती चोरीस गेल्याचे जाहीर करावे, ते जमले नाही तर अस्तित्वात नसलेली पण कागदोपत्री रंगवून दाखवलेल्या विहिरीची पोकळ नोंद तरी रद्द करावी या मागणीसाठी आळसंद ग्रामस्थांनी विटा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

आळसंद ता. खानापूर येथील योगीराज महादेव जंगम यांच्याकडे श्री काशी विश्वेश्वर देवस्थानची गट क्र. 1674 अ व 1674 ब अशी जमीन वाहिवाटीची इनाम जमीन आहे. त्यापैकी 1674 ब मध्ये पूर्वी पासून 3 विहिरी आहेत,  मात्र या गटात तहसीलदारांच्या आदेशानुसार कुठेच अस्तित्वात नसलेल्या चौथ्या विहिरी कागदोपत्री नोंद झाली आहे, ही पोकळ नोंद रद्द व्हावी अशी मागणी करत जंगम कुटुंबीय उपोषणाला बसले आहे, आता प्रजासत्ताक दिनाला अवघे 4 दिवस राहिले आहेत, तोपर्यंत तोडगा न निघाल्यास ध्वजारोहणा दिवशीही उपोषण सुरू राहिल्याची नामुष्की येणार आहे.

दरम्यान याबाबत विट्यच्या तहसीलदार रंजना उवरहंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, वास्तविक संबंधित प्रकरणात केवळ शब्दच्छल झाल्यामुळे गडबड झाली आहे. संबंधित त्या जमिनीचा व्यवहार झालेला आहे. खरेदीदार पार्टीने जुन्या विहीरीचे नूतनीकरण केले आणि त्याची नोंद घालताना नवीन विहीर अशी घातली असल्याचे दिसत आहे, असे सांगत याबाबत आपण प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्याशी चर्चा केली आहे. उद्यापर्यंत त्यावर तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली आहे.