Fri, Apr 19, 2019 12:07होमपेज › Sangli › नोकरी देण्याच्या आमिषाने दोन लाखांना गंडा

नोकरी देण्याच्या आमिषाने दोन लाखांना गंडा

Published On: Aug 29 2018 1:29AM | Last Updated: Aug 29 2018 12:24AMसांगली : प्रतिनिधी

तलाठी म्हणून नोकरी देतो, असे सांगून दोन लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी ठकसेन प्रकाश कल्लेशा पाटील (रा. वसंतनगर) याच्याविरोधात मंगळवारी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ठकसेन पाटीलने सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील अनेकांना शासकीय नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांना गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला गेल्या आठवड्यात हातकणंगले पोलिसांनी अटक केली आहे. 

याप्रकरणी सचिन शामराव पाटील (वय 40, रा. चिकुर्डे, ता. वाळवा) यांनी फिर्याद दिली आहे. सचिन पाटील यांना दि. 20 मे 2014 रोजी  एक भेटकार्ड आले. सोलापूरचा उपविभागीय अधिकारी रमेश एन. वाडकर असा त्या कार्डवर उल्लेख आणि त्याचा मोबाईल क्रमांकही होता. 

पाटील यांनी त्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी ठकसेन प्रकाशने त्यांच्या शिक्षणाची माहिती घेतली. त्यानंतर तुम्हाला तलाठी म्हणून नोकरी देतो, त्यासाठी तीन लाख रूपये द्यावे लागतील, असे सांगितले. 

त्यावेळी सचिन यांनी इतके पैसे देण्याची तयारी नसल्याचे सांगितले. नंतर ठकसेनाने दोन लाख आता द्या व एक लाख रूपये कामावर हजर झाल्यावर द्या, असे सांगितले. त्यानंतर दि.7 नोव्हेंबर 2014 रोजी एक लाख रूपये घेऊन सांगलीतील बालाजी चौकातील एका हॉटेलमध्ये सचिन पाटील यांना त्याने बोलावून घेतले. तेथे त्याने एक लाख रूपये रोख घेतले. 

त्यानंतर दि. 12 नोव्हेंबर रोजी पुन्हा त्याच हॉटेलमध्ये सचिन यांनी त्याला एक लाख रूपये दिले. त्यावेळी तो एका आलिशान कारमधून आला होता. तसेच त्याच्यासोबत असलेली व्यक्ती पोलिस उपनिरीक्षक असल्याचेही त्याने सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी सचिन यांच्या मोबाईलवर एक फोन आला. त्या व्यक्तीने ‘तुमची राधानगरी येथे तलाठी म्हणून नेमणूक झाली आहे’ असे सांगितले. ‘दोन दिवसानंतर फोन करा’, असेही त्या व्यक्तीने सांगितले. नंतर मात्र पाटील यांचा फोन त्यांनी उचलला नाही. 

नंतर त्यांनी रमेश वाडकर नावाच्या व्यक्तीबाबत सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली. त्यावेळी अशी व्यक्ती तसेच उपविभागीय अधिकारी सोलापूर युनिट अशा पदावर सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यात कोणीही व्यक्ती नसल्याचे सांगण्यात आले. 

त्यानंतर दि.23 ऑगस्ट रोजी  पाटील यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात त्या व्यक्तीबाबत चौकशी केल्यानंतर त्याचे नाव प्रकाश पाटील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठून त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधावा दरम्यान प्रकाश पाटील याच्याकडून फसवणूक झालेल्या लोकांनी सांगली शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक रोहित चौधरी यांनी केले आहे.