Mon, Apr 22, 2019 05:42होमपेज › Sangli › हिवरेच्या जिगरबाज जवानाने केला अतिरेक्यांचा खात्मा

हिवरेच्या जिगरबाज जवानाने केला अतिरेक्यांचा खात्मा

Published On: Jan 23 2018 1:14AM | Last Updated: Jan 22 2018 9:41PMसांगली :  प्रतिनिधी 

लेथपोरा (जि. पुलवामा, श्रीनगर) येथील केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दल (सीआरपीएफ) च्या बटालियन क्रमांक 185 च्या ट्रेनिंग सेंटरवर तीन अतिरेक्यांनी घुसखोरी करून बेछूट गोळीबार सुरू केला. सीआरपीएफचे जवान समाधान मलमे यांनी प्रत्युत्तरादाखल जोरदार गोळीबार करुन  सहकारी  जवानांच्या मदतीने तीन अतिरेक्यांचा खात्मा केला. मलमे हे हिवरे (ता. जत, जि. सांगली) येथील आहेत. 
दि. 30 डिसेंबररोजी तीन अतिरेक्यांनी मलमे असलेल्या कॅम्पच्या एका इमारतीमध्ये घुसखोरी करुन जवानांवर गोळीबार सुरू केला. ज्या ठिकाणी गोळीबार झाला, तेथून हाकेच्या अंतरावरच सीआरपीएफचे जवान समाधान मलमे सहकार्‍यांसह देशसेवा बजावत होते. अतिरेक्यांच्या पहिल्या फायरिंगमध्येच मलमे यांच्या उजव्या खांद्यातून घुसलेली गोळी मानेजवळ थांबली होती. मात्र एवढ्या गंभीर जखमेचा विचार न करता मलमे यांनी अतिरेक्यांना जोरात फायरिंग करुन रोखले, त्यांचा   खात्मा केला. क्षणात कॅम्पमधील अन्य जवानांचा फौजफाटा घेऊन वरिष्ठ अधिकार्‍यांची तुकडी तेथे दाखल झाली. कॅम्पच्या इमारतीमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांपैकी एकाला संपविण्यात यश आले. 

या हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद तर तिघेजण गंभीर जखमी झाले. यामध्ये  जवान समाधान मलमे  यांचाही समावेश होता. मलमे यांच्या उजव्या खांद्यात घुसलेली गोळी मणक्यापर्यंत गेली होती.  सीआरपीएफच्या जवानांनी तात्काळ मलमे यांना श्रीनगर येथील लष्करी रुग्णालयात दाखल केले. गोळी काढण्यासाठी मोठी शस्त्रक्रिया त्यांच्यावर केल्यामुळे ते वीस दिवस रुग्णालयातच होते. जवळपास पंचवीस टाक्यांची गंभीर शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. दि. 19 जानेवारी 2018 रोजी ते वैद्यकीय रजेवर हिवरे या गावी दाखल झाले आहेत.