Tue, Mar 26, 2019 08:30होमपेज › Sangli › सांगलीकरांची दाढी आता सोन्याच्या वस्ताऱ्याने 

सांगलीकरांची दाढी आता सोन्याच्या वस्ताऱ्याने 

Published On: May 16 2018 9:21PM | Last Updated: May 17 2018 1:24AMसांगलीः प्रतिनिधी

सोन्याचा चमच्याने जेवण केलेले आपण ऐकले असेल पण, "सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढी केली जाते" असे म्हटले तर आपला कदाचित विश्वास बसणार नाही. पण सांगलीतील एका सलून व्यावसायिकाने तब्बल दहा तोळ्यांचा सोन्याचा वस्तारा बनवून घेतला आहे. 

आज प्रत्येक व्यवसायात स्पर्धा सुरु आहे. आपला व्यवसाय अधिक चांगला कसा होईल, ग्राहक कसे आकर्षित करता येतील यासाठी अनेक व्यवसायिक वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. अशीच एका अफलातून शक्कल रामचंद्र काशीद या सलून व्यवसायिकाने लढवली आहे. 

रामचंद्र यांनी दाढी करण्यासाठी चक्क सोन्याचा वस्तरा बनवला आहे. सांगलीच्या गावभाग येथे रामचंद यांचे 'उस्त्रा फॉर मेन्स' हे सलून आहे. त्यांनी आपल्या दुकानात दाढी करण्यासाठी तब्ब्ल दहा तोळे, १८ कॅरटचा सोन्याचा वस्तरा बनवून घेतला आहे. यासाठी त्यांनी साडे तीन लाख रूपये खर्च केला. सोन्याचा वस्तरा बनवणे तशी सोपी गोष्ट नव्हती, कारण अनेक सराफ व्यावसायिकांनी सुरूवातीला रामचंद यांना नकार दिला होता. मात्र, सांगलीतील चंदू काका सराफ यांच्यातर्फे पुण्यातून एका कुशल कारीगाराकडून अगदी हुबेहूब सोन्याचा वस्तरा तयार करून घेतला. 

आपल्या आई- वडिलांच्या ३३ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिनी रामचंद्र याने या सोनेरी वस्तऱ्याचा शुभारंभ केला. आज रामचंद्र यांच्या दुकानात अनेकजण हा सोन्याचा वस्तरा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. या सोन्याचा वस्तऱ्याने दाढी करायचे दर तसे खिश्याला परवडणारे नाहीत. पण एकदा तरी सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करण्याची हौस भागवणारे नक्कीच माझ्याकडे येतील अशी अपेक्षा रामचंद काशीद यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या सोन्याच्या वस्ताऱ्याची चर्चा मात्र सांगली शहरात जोरदार रंगली आहे.
 

Tags : sangali, gold gazette, vastara, saving, saloon, sangali news