होमपेज › Sangli › केरळ, गोव्याप्रमाणे शेतकर्‍यांना पेन्शन द्या

केरळ, गोव्याप्रमाणे शेतकर्‍यांना पेन्शन द्या

Published On: Dec 01 2017 11:47PM | Last Updated: Dec 01 2017 8:58PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

केरळ, गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही वृद्ध शेतकर्‍यांना पेन्शन योजना सुरू करावी या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्यात येत आहे. सांगलीत तरुण भारत स्टेडियमवर दि. 17 रोजी सकाळी 10 वाजता शेतकरी पेन्शन परिषद घेतली जाणार आहे, अशी माहिती जनता दल (धर्मनिरपेक्ष) प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जनता दलाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. के. डी. शिंदे, शशिकांत गायकवाड, जनार्दन गोंधळी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. पाटील म्हणाले, भारतीय राज्य घटनेने देशातील सर्व नागरिकांना जगण्याचा मूलभूत हक्क दिला आहे. जगणे यांचा अर्थ सन्मानाने जगणे असा आहे. 

मात्र या देशात शेतकरी हा एकमेव घटक आहे की जो सन्मानाने जगू शकत नाही. निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असणारी शेती, बेभरवशाचा दर, शेतकरी विरोधी सरकारी धोरणे, सरकार व भांडवलदारांनी संगनमताने केलेली शेतकर्‍यांची लूट यामुळे शेतकरी आत्महत्या करायला लागले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या पाच मूलभूत बाबी नागरिकांना पुरवणे हे सरकारचे काम आहे. शेतकरी सन्मानाने जगायचा असेल तर त्याला साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन देणे सरकारचे कर्तव्य आणि शेतकर्‍यांचा हक्क आहे. 

ट्रॅक्टरच्या वाहन करात सवलत द्या

ट्रॅक्टर हे शेतकरी वापराचे वाहन आहे. ट्रॅक्टरवर कमर्शिअल दराने वाहन कर आकारू नये, अशी मागणीही प्रा. पाटील यांनी केली आहे.