Wed, Aug 21, 2019 01:54होमपेज › Sangli › मनपासाठी शिवसेनेचीही मोर्चेबांधणी

मनपासाठी शिवसेनेचीही मोर्चेबांधणी

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 10:15PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी आता शिवसेनेनेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच भाजपही त्यांचे टार्गेट आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत सांगलीच्या शिवसेना पदाधिकार्‍यांची नुकतीच बैठक झाली. त्या बैठकीत पूर्ण ताकद  देण्याचा शब्द देण्यात आला आहे. 

उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सांगलीची सर्व प्रकारची जबाबदारी सोपवली आहे, असे समजते.  नेत्यांनी मदतीचा शब्द  दिल्यामुळे स्थानिक नेत्यांनी आता शाखा उद्घाटनाचा धडाका सुरू केला आहे. 

जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई लढणार्‍या शिवसेनेला गेल्या काही वर्षांत मोठे बळ मिळाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी भाजप नेते माजी आमदार संभाजी पवार, उमेदवार पृथ्वीराज पवार यांच्या प्रवेशाने संघटनेला उर्जितावस्था मिळाली होती. त्यानिमित्ताने महापालिकेत स्वाभिमानीच्या रूपाने शिवसेनेचे अस्तित्व निर्माण झाले होते. परंतु स्थानिक पदाधिकार्‍यांशी न जुळल्याने ते आत्तापर्यंत सेनेत विशेष सक्रिय नव्हते. 

दरम्यान, शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी पुन्हा बांधणी सुरू केली. त्यामुळे गेल्या चार-सहा महिन्यांपासून शिवसेनेने पुन्हा उचल खाल्ली आहे. उपमहापौर गटाचे नेते नगरसेवक शेखर माने यांच्या पक्षप्रवेशनिमित्तानेही संघटनेला बळ मिळाले. महापालिकेतील भानगडी रोखण्याचा त्यांनी धडाका सुरू ठेवला आहे. खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा एक गट पुन्हा ताकदीने बांधला गेला आहे. 

त्यामुळे आता महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची भाषा संघटनेने सुरू केली आहे. विशेषतः भाजपला शह देण्याचे त्यांचे मनसुबे स्पष्ट झाले आहेत.मुंबईत श्री. ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीस जिल्हाध्यक्ष संजय विभुते, शेखर माने, पृथ्वीराज पवार आदी उपस्थित होते. त्यावेळी महापालिका ताकदीने लढण्याचा निर्धार ठाकरे यांनी जाहीर करून तयारीचे आदेशही दिले आहेत. यानुसार गौतम पवार यांंच्यासमवेत स्वाभिमानीचे काही नगरसेवक आता शिवसेनेसोबत काम करणार असल्याचे समजते. युवासेनेच्या राज्य कार्यकारिणीत संधी मिळताच पृथ्वीराज पवार यांनी गावभागात सुमारे 10 हून अधिक ठिकाणी शाखा सुरू केल्या आहेत.