Sat, Feb 23, 2019 22:27होमपेज › Sangli › थर्टी फर्स्ट पार्ट्यांवर उत्पादन शुल्कची नजर

थर्टी फर्स्ट पार्ट्यांवर उत्पादन शुल्कची नजर

Published On: Dec 30 2017 12:44AM | Last Updated: Dec 29 2017 9:13PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

थर्टी फर्स्टच्या निमित्ताने साजर्‍या होणार्‍या पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची काटेकोर नजर असणार आहे. वर्षाअखेरीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या मदतीने तात्पुरते तपासणी नाके उभारण्यात आली आहेत. या काळात परराज्यातून येणार्‍या वाहनांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. एस.टी. आणि रेल्वेची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली.  

थर्टी फर्स्टच्या काळात परराज्यातून मद्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. त्यामुळे मिरज तालुक्यातील लक्ष्मीवाडी, म्हैसाळ, सलगरे, कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा, जत तालुक्यातीलही सीमाभागात विशेष नजर ठेवण्यात आली आहे.  थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांसह अवैध दारू वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी तीन भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.  


सध्या या पथकांमार्फत ढाबे, हॉटेल, खानावळींची तपासणी सुरू आहे. तेथे असणारे मद्यही तपासले जात आहे. परवाना नसताना मद्य विक्री करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.  
वर्षाअखेरीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्यावतीने महिनाभरापासून अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी नाकाबंदी व गस्त घातली जात आहे. शिगाव, कुमठे फाटा, डफळापूर, कर्नाळ, सांगली, मिरज, अंकली आदी ठिकाणी छापे टाकून विदेशी व देशी मद्य जप्त करण्यात आले आहे. संशयितांनाही अटक करण्यात आली आहे. 

बिअरबार पहाटे पाचपर्यंत उघडे

दि. 31 डिसेंबररोजी बिअरबार, परमिट रूम पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. वाईन शॉप, बिअर शॉपी रात्री एक  वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याचे अधीक्षक शेडगे यांनी सांगितले. मद्य पिणार्‍या ग्राहकांना त्याबाबतचा परवाना जवळ असणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे परवाने सर्व वाईन शॉप, परमिट रूममध्ये उपलब्ध आहेत.