Sun, Aug 25, 2019 12:18होमपेज › Sangli › थापेबाज भाजपला थारा देऊ नका

थापेबाज भाजपला थारा देऊ नका

Published On: Feb 18 2018 10:42PM | Last Updated: Feb 18 2018 9:29PMसांगली  : प्रतिनिधी

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या कारभाराला जनता त्रासली आहे. त्यामुळेच आता त्यांचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. त्यासाठी पुन्हा भेटवस्तूंसह विविध थापा मारत भाजप समोर येत आहे. अशा थापेबाजांना थारा देऊ नका, असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांनी केले. येथील प्रभाग 37 मध्ये विविध विकासकामांच्या निमित्ताने काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी मनपा निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. श्रीमती पाटील यांचा डॉ. कदम यांच्याहस्ते नागरी सत्कारही  करण्यात आला.

काँग्रेसनेते स्व. मदन पाटील यांनी दिलेल्या संकल्पनाम्यातील 90 टक्केहून अधिक कामे पूर्ण केली आहेत. प्रभाग 37 मध्येच तीन कोटी रुपयांची विकासकामे होत आहेत. त्यामुळे मनपा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचीच हवा असल्याचे श्रीमती पाटील म्हणाल्या. कार्यक्रमाचे संयोजन युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मंगेश चव्हाण, नगरसेवक किशोर लाटणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले होते.
यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर हारुण शिकलगार, स्थायी समिती सभापती बसवेश्‍वर सातपुते, डॉ. जितेश कदम, गुंठेवारी समिती सभापती शालन चव्हाण, नगरसेवक राजेश नाईक, दिलीप पाटील, पुष्पलता पाटील, रोहिणी पाटील, अश्‍विनी खंडागळे, बाळासाहेब गोंधळे, युवानेते मयूर पाटील, अजित सूर्यवंशी, इचलकरंजीचे नगरसेवक रवींद्र माने, संजय तेलनाडे, जयसिंगपूरचे बजरंग खामकर, प्रकाश झेले, सतीश सारडा, सावकार शिराळे आदी उपस्थित होते.

डॉ. कदम म्हणाले, भाजपने भूलथापा देऊन सत्ता मिळविली होती. परंतु गेल्या तीन-चार वर्षांत एकाही आश्‍वासनाची पूर्ती केली नाही. उलट जातीयवाद, धर्मवादाद्वारे भाजपने देशाचे वाटोळेच केले आहे. त्यामुळे जनतेने त्यांचा हिशेब करून गुजरात, नांदेड, राजस्थानच्या निवडणुकांत हिसका दाखविला आहे. आता महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही अशाच रितीने आयात कार्यकर्त्यांवर सत्तेची स्वप्ने पाहात आहेत. जनतेला भेटवस्तूंसह खोटी आश्‍वासने देऊन समोर येत आहेत. परंतु काँगे्रेसने पाच वर्षांत शहरात विकासकामांद्वारे आश्‍वासन पाळले आहे. सध्या विकासकामांचा धडाका सुरू आहे.   त्यामुळे जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आगामी महापालिका निवडणूक ही त्याची सुरुवात असेल. त्यासाठी मंगेश चव्हाण आणि सर्वच नगरसेवकांच्या मी आणि जयश्री पाटील पूर्ण ताकद पाठीशी लावू. यावेळी डॉ. कदम यांनी शिकलगार यांचा दबंग महापौर असा उल्लेख करताच उपस्थितांत हशा पिकला.

जयश्री पाटील म्हणाल्या, मदनभाऊंनी दिलेल्या आश्‍वासनांची काँगेसने पूर्ती केली आहे. सांगली उत्तम करण्याचे स्वप्न सत्यात उतरत आहे. त्यामुळे जातीयवादी पक्षाला जनता थारा देणार नाही. 
पृथ्वीराज पाटील म्हणाले, काँग्रेस विकासकामांतून बोलते. विचार आणि कामांच्या जोरावरच निवडणुकीला समोर जाते. पण जनतेचा भ्रमनिरास करणारा जातीयवादी भाजप खुलेआम भेटवस्तू आणि फोडाफोडीच्या माध्यमातून निवडणुकीला समोर जाण्याची स्वप्ने पहात आहे. त्यामुळे जनता असल्यांना संधी देऊन सांगली उद्ध्वस्त होऊ देणार नाही.

शिकलगार म्हणाले, काँग्रेसने मनपाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. उलट भाजपच्या थापेबाजांची हवा संपली आहे. यापुढे विकासाच्या जोरावर फक्‍त काँग्रेसचीच हवा 
राहील.

या कार्यक्रमासोबतच ढोलकीच्या तालावर फेम ऐश्वर्या बडदे, अकलूज महोत्सव विजेत्यांचे नृत्य, मुंबई येथील बॉलीवूड डान्स शो, संगीत सम्राट रॉक शोद्वारे उपस्थितांना संगीत पर्वणी देण्यात आली.  कार्यक्रमाचे संयोजन विजय आवळे, शिरीष सूर्यवंशी, शुभम बनसोडे, प्रितम रेवणकर, आकाश चोरमले, डॉ. चेतन पाटील, समीर साखरे, विनायक पाटील आदींनी केले.