Mon, Aug 19, 2019 11:23होमपेज › Sangli › आता बेकायदा होर्डिंग छापणार्‍यांवरही फौजदारी

आता बेकायदा होर्डिंग छापणार्‍यांवरही फौजदारी

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 10:17PMसांगली : प्रतिनिधी

बेकायदा डिजिटल व होर्डिंग लावणार्‍यांबरोबरच त्याची छपाई करणार्‍यांवरही आता फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. शहर विद्रुपीकरणाचा हा बाजार रोखण्याचे उच्च न्यायालय तसेच शासनाचेही सक्‍त निर्देश आहेत. त्यानुसार कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

खेबुडकर म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही शहरात यापूर्वी पोस्टर, डिजिटल विरोधात मोठी मोहीम राबविली होती. यातून शेकडो पोस्टर जप्त केले. ते लावणार्‍यांविरुद्ध गुन्हेही दाखल केले; परंतु त्यानंतरही हा शहर विद्रुपीकरण करण्याचा उद्योग थांबला नाही. या पोस्टरमुळे निव्वळ सामाजिकच नव्हे, तर राजकीय प्रश्‍न निर्माण होत आहेत. त्यामुळेच आम्ही आता अशा बेकायदा पोस्टर छपाई करणार्‍यांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. 

यातून सांगलीत सात व मिरजेत सात अशी बेकायदा छपाई करणारे 14 मशिन सील केली आहेत.  बेकायदा छपाईपुरतीच ही कारवाई नाही. त्यांनी महापालिकेचे व्यवसाय परवानेही घेतले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

खेबुडकर म्हणाले, त्यामुळे पहिल्या टप्प्यात या व्यवसायांची मशिन सील केली आहेत; मात्र अद्यापही शहरात बेकायदा होर्डिंग, डिजिटल लावल्याचे दिसून आले आहेत. त्यावरही कारवाईचे आदेश दिले आहेत. 

यापुढेे अशा पोस्टर, होर्डिंग छपाई करणार्‍यांनी पोलिस प्रशासन आणि महापालिकेचा ना हरकत दाखला असल्याशिवाय कोणत्याही प्रकारे छपाई करू नये. छपाई करण्यापूर्वीच त्याच्या किती प्रती छापल्या, स्थळ, कालावधी याची स्पष्ट प्रमाणपत्रात नोंदणी, त्या पोस्टरवरही नोंद असणे बंधनकारक राहणार आहे; अन्यथा पोस्टर लावणार्‍यांबरोबरच त्याची छपाई करणार्‍यांवरही महापालिका मालमत्ता विद्रुपीकरण कायदा 1995 नुसार फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. त्यांचे व्यवसाय परवाने रद्द करण्याचीही कारवाई केली जाईल, असे आयुक्‍त खेबुडकर यांनी सांगितले.