होमपेज › Sangli › चांदोलीत वणव्यात पर्यावरणाचा होतोय र्‍हास

चांदोलीत वणव्यात पर्यावरणाचा होतोय र्‍हास

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 1:20AMवारणावती : आष्पाक आत्तार

जैवविविधतेने नटलेल्या आणि अनेक प्राणी-पक्षी यांचे आश्रयस्थान असलेल्या चांदोलीसह शाहुवाडी तालुक्यातील डोंगरदर्‍यातून आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक जीव-जंतू आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नष्ट होऊ लागले आहेत. तर शेकडो एकर गवत जाळून खाक केले जात आहे.

उन्हाळा सुरू झाला आणि पावसाळा जवळ आला की या परिसरात असे वणवे दरवर्षी पेटू लागतात. पूर्वीचे गवत जाळल्यामुळे पावसाळ्यात येणारे गवत हे चांगले येते. या समजुतीने असे प्रकार सर्रास घडतात. काही विकृत माणसे आगी लावण्याचे काम करतात.एकदा आग लागली की शेकडो हेक्टर परिसरात ती पसरते. अनेकदा ही आग अभयारण्य परिसरातही मार्गक्रमण करते. त्यामुळे वन कर्मचारी, अधिकार्‍यांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

अनेकदा रात्रीच्या वेळी असा प्रकार केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीव-जंतू होरपळून मरण पावतात. सध्या चांदोली धरण व अभयारण्य परिसरासह मणदूर, मिरुखेवाडी, गुढे पाचगणी, जाधववाडी, खुंदलापूर, शित्तुर, उदगिरी  डोंगरदर्‍यात हे वणवे  मोठ्या प्रमाणात पेटू लागले आहेत. परिणामी एरवी हिरव्यागर्द वनराईने नटलेले डोंगर आता काळे ठिक्कर दिसू लागले आहेत.     

शिराळा तालुक्यातील आरळा येथून तसेच शाहुवाडी तालुक्यातील डोंगरदर्‍यातून उदगिरीला जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावरून  येताना व जाताना डोंगरदर्‍यातून गवताला आगी लावण्याचे काम काही विकृत माणसे करतात. या परिसरात कोणाचीही देखरेख नसल्यामुळे अशा वृत्ती फोफावत आहेत. एकदा आग लागली की ती अनेक दिवस धुमसत राहते. त्यामुळे पशु-पक्षी सैरावैरा धावायला लागतात. अनेक सुक्ष्म जीव होरपळून जातात. मालकी हद्दीत आग लावल्याचे कारण पुढे करून संबंधित अधिकारी जबाबदारी झटकतात. गेल्या अनेक वर्षापासून असे प्रकार घडतात; मात्र त्यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. आग लागल्यानंतर ती आटोक्यात आणण्यापेक्षा ती लावली जावू नये यासाठी प्रबोधन करण्याची तसेच संबंधितावर कडक करवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.