Fri, Jan 18, 2019 12:00होमपेज › Sangli › हातात पुस्तक धरतो, तो दंगल करत नाही

हातात पुस्तक धरतो, तो दंगल करत नाही

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 09 2018 11:15PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

खरे काय, खोटे काय हे पुस्तके शिकवतात. हातात जो पुस्तक धरतो, तो हातात दगड धरत नाही. दंगल करावी असे त्याला कधीच वाटत नाही. कुणाच्या फसवणुकीला बळी पडून त्याचे मत आणि मन परिवर्तन होऊ शकणार नाही, असे प्रतिपादन शासनाच्या ‘बालभारती’चे संपादक किरण केंद्रे यांनी केले. 

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व राजमती सार्वजनिक ग्रंथालयातर्फे सांगलीत राजमती भवन येथे मंगळवारी ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन झाले. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तम्मनगौडा रवि-पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, साहित्यिक सुभाष कवडे, मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य अध्यक्ष विजयसिंह गायकवाड, शिक्षणाधिकारी महेश चोथे, कक्ष अधिकारी अजिंक्य कुंभार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी किरण पाटील, तसेच बाळासाहेब शेटे, शिक्षक परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष अर्जुन चव्हाण उपस्थित होते. 

जिल्हा परिषद ते राजमती भवनपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महेश चोथे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निशादेवी वाघमोडे उपस्थित होते. ग्रंथदिंडीत विद्यार्थी वेशभूषा करून सहभागी झाले होते.  केंद्रे म्हणाले, जगण्यासाठी भाकरीला जितके महत्व आहे, तितकेच ते पुस्तकांना आहे. मनाची, डोळ्याची भूक भाकरीने भागत नाही. ती भूक पुस्तकांनी भागते. पुस्तकांमुळे मानवी जीवन खर्‍या अर्थाने समृद्ध होते. जो हातात पुस्तक धरतो, तो कधीच हातात दगड धरणार नाही. सुरेश पाटील म्हणाले, वाचन संस्कृती अलिकडे लोप पावत चालली आहे. मन व मेंदू बळकट करण्यासाठी ज्ञानाचे संवर्धन हवे. प्रास्ताविक अजिंक्य कुंभार यांनी केले. विस्तार अधिकारी एम. टी. लिगाडे, विठ्ठल मोहिते, आशिष यमगर, बजरंग संकपाळ, प्रकाश वायदंडे यांनी संयोजन केले.