Sun, May 26, 2019 20:40होमपेज › Sangli › हुल्लडबाजी, तोडफोडीनंतर सांगली शांत

हुल्लडबाजी, तोडफोडीनंतर सांगली शांत

Published On: Jan 04 2018 8:36AM | Last Updated: Jan 04 2018 8:36AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव प्रकरणावरून सांगलीत दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. आंदोलनाच्या नावावर उठलेल्या टोळक्यांनी हुल्लडबाजी केली. अनेक ठिकाणी रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा, दुकानांची तोडफोड केलीच. यातून दोन गट एकत्र आमने-सामने येऊ लागल्याने शहरात भीतीयुक्‍त दहशतीचेच वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शाळांनी अर्ध्यातूनच विद्यार्थ्यांना सोडले. एकूणच शहरात कर्फ्यूसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

बुधवारी  महाराष्ट्र बंदच्या  हाकेनुसार सांगलीतही सकाळपासून संमिश्र बंद होता. परंतु मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यावर तरुण उतरले. येथील शास्त्री चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गर्दी जमा झाली. त्यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा काढण्यात आला. मोर्चाने सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले. 

पण गर्दीचा रोष नियंत्रणाबाहेर गेल्याने काही तरुणांनी मोटार सायकलींवरून काठ्या, रॉड घेऊन रॅलीद्वारे शहर बंद पाडण्यासाठी पुढाकार घेतला. काठ्या, रॉड, लोखंडी गज घेऊन फिरणार्‍या या सैरभैर तरुणांनी अनेक ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी गाड्या फोडल्या. बापट बाल शिक्षण मंदिर, गणपती पेठ, गवळी गल्ली, राम मंदिर रस्ता, कर्मवीर भाऊराव पाटील चौक परिसर, झुलेलाल चौक-सिव्हिल रस्ता, शास्त्री चौक, खणभागासह अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आली. या मोटारसायकलींवरील तरुणांनी घोषणाबाजी करीत दुकाने, कार्यालये बंद करण्यासाठी दंगा सुरू केला. काही ठिकाणी तोडफोड आणि दगडफेक होताच क्षणार्धात सर्व दुकानांची शटरडाऊन झाली. 

दरम्यान, दत्त-मारुती रस्त्यासह अनेक परिसरात तोडफोड करणार्‍या तरुणांना पांगविण्यासाठी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्‍त अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक धीरज पाटील, शहर पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्यासह फौजफाटा रस्त्यावर उतरला. अनेक ठिकाणी पोलिसांनी लाठ्या उगारताच हुल्लडबाजांची पांगापांग झाली. शहरातील अनेक शाळांनी सुटी दिली होती.