Thu, May 23, 2019 20:26
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › लाच घेताना ‘औषध’च्या सहायक आयुक्तास अटक

लाच घेताना ‘औषध’च्या सहायक आयुक्तास अटक

Published On: Aug 29 2018 1:29AM | Last Updated: Aug 29 2018 12:17AMसांगली : प्रतिनिधी

औषध दुकानाचा परवाना नूतनीकरणासाठी पाच हजारांची लाच घेताना औषध विभागाच्या सहायक आयुक्तास रंगेहाथ पकडण्यात आले. दिलीप काशीनाथ जगताप (वय 57, सध्या रा. विजयनगर, सांगली, मूळ रा. सातारा) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विजयनगर चौक परिसरात ही कारवाई केली. 

जगताप यांनी सांगलीच्या औषध विभागाचे सहायक आयुक्त म्हणून एका महिन्यापूर्वीच कार्यभार स्वीकारला आहे. विजयनगर चौक परिसरातील एका औषध दुकानाचा औषध विक्रीच्या परवान्याचे नूतनीकरण करायचे होते. त्यासाठी जगताप यांनी त्या दुकानदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. 

याबाबत संबंधित दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर जगताप यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते. 
मंगळवारी सायंकाळी तक्रारदार दुकानदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना जगताप यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

 याबाबत रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी लाचेची मागणी केल्यास लाचुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन उपअधीक्षक राजेंद्र तेंडूलकर यांनी केले आहे.