Tue, May 26, 2020 17:25होमपेज › Sangli › तासगाव : सावळज -बिरणवाडी पूल गेला वाहून (Video)

तासगाव : सावळज -बिरणवाडी पूल गेला वाहून (Video)

Last Updated: Oct 11 2019 10:28AM
तासगाव : प्रतिनिधी

दुष्काळी भागातील मुसळधार पावसामुळे अग्रणी नदीला पूर आला आहे. या भागात झालेल्‍या जोरदार पावसामुळे अग्रणी नदीचा पूर ओसरायचे नावच घेत नाही. वाढत्या पाण्यामुळे जवळपास सहा ते सात पूल पाण्याखाली गेले आहेत. दरम्‍यान गुरुवारी मध्यरात्री उशीरा सावळज- बिरणवाडी रस्त्यावरील पूलच पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.

बुधवारी रात्रभर सावळज - बिरणवाडी रस्त्याच्या पूलावरून पाणी वाहत होते. गुरूवारी सकाळी थोडासा पूर ओसरु लागताच सावळज बाजूकडील रस्ता उखडून पूल खचला असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात आली. याची गंभीर दखल घेत पूलावरील दुचाकी तसेच चार चाकी वाहतूक बंद करण्याचे आदेश तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिले होते. 

पावसाचा जोर कायम राहिल्याने गुरुवारी रात्रीही सिध्देवाडी तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी खाली आले. यामुळे अगोदर रस्ता उखडून खचलेला सावळज ते बिरणवाडी पूल वाहून गेला आहे. दरम्यान यामळे या दोन गावांमधील संपर्क पुर्णपणे तुटला आहे.

अग्रणीचे पाणी गव्हाण गावात शिरले

अग्रणी नदीला आलेल्या पुरामुळे नदीचे पाणी आता लोक वस्तीमध्ये शिरू लागले आहे. गुरुवारी रात्री झालेल्या तुफान पावसामुळे नदीचे पाणी गव्हाण गावामध्ये शिरले आहे. नदी पात्रालगत असलेल्या पान टप-या, सलूनची दुकाने निम्मी पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान पूराचे पाणी गावात शिरू लागल्याने  ग्रामस्थांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.