Wed, Apr 24, 2019 20:03होमपेज › Sangli › निवडणुका मॅनेजमध्ये आरएसएसचा हात

निवडणुका मॅनेजमध्ये आरएसएसचा हात

Published On: Sep 02 2018 1:17AM | Last Updated: Sep 02 2018 12:58AMसांगली : प्रतिनिधी

महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीमुळे केंद्र व राज्यातील भाजप सत्तेविरोधात जनक्षोभ उसळला आहे. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने ईव्हीएम मशिन मॅनेजचा फंडा अवलंबला आहे. ही जबाबदारी पेलण्यासाठी आरएसएस सरसावली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. पारदर्शी कारभाराचा दावा करणार्‍या भाजपने हिंमत असेल तर निवडणुका मतदान पत्रिकेवर घ्याव्यात, असे आव्हानही त्यांनी दिले. 

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा शनिवारी रात्री येथे आली. काँग्रेस कमिटीसमोर आयोजित जाहीर सभेत राज्यातील नेत्यांनी भाजप सरकारविरोधात एल्गार केला. भाजपच्या हद्दपारीची सुरुवात सांगलीतून करा, असे आवाहन संघर्ष यात्रेत सहभागी सर्व नेत्यांनी केले. 

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सतेज पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम,  शरद रणपिसे, विजय वडेट्टीवार, सचिन सावंत, महिला प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, युवानेते विशाल पाटील, शैलजा पाटील यांच्यासह  अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ना खाऊंगा ना खाने दूँगा, म्हणणार्‍या भाजपनेत्यांनी खाऊन खाऊन प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. राज्यातील सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्ड्यांत घातले आहेत. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र म्हणत घोषणा केल्या, त्या फोल ठरल्या आहेत. उलट सरकारच्या कृपेने देशात सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण मोठे वाढले आहे. तरीही मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात नोकर्‍या देऊ. दुसरीकडे केंद्रीय मंत्री गडकरी म्हणतात नोकर्‍या आहेत कुठे? एकूणच प्रश्‍न गंभीर आहे.  

ते म्हणाले, शेतकरी समाधानी नाही. नोटाबंदी, जीएसटीसह सर्वच निर्णय फसले आहेत. आरक्षणांचा विषय यांनी झुलवत  ठेवून फसविले. तरी निवडणुका ते जिंकतात कसे? त्यांनी यासाठी ईव्हीएम मशिनचा फंडाव अवलंबला आहे. यात  फ्रॉड आहे हे आम्ही नव्हे तर देशभर लोकच बोलत आहेत. त्यामुळे मतदान पारदर्शीपणे पुन्हा मतपत्रिकेवर घ्यावे, अशी सर्वांकडून मागणी सुरू आहे. तरीही सरकार हे करायला तयार नाही. त्याही पुढे जाऊन आता मतदार याद्यात घोळ करायला सुरुवात केली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान निवडणुकीत ते दिसून आले आहे. भाजपविरोधी मतदारांची नावेच गायब केली जात आहेत. यासाठी आरएसएसची फौज कामाला लागली आहे. त्यामुळे हा कुटील डाव उधळण्यासाठी मतदार याद्या तपासा. जनसंघर्ष यात्रेचा एल्गार आता तापवत ठेवून भाजपला हद्दपार करा.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजप सरकारने गेल्या चार वर्षांत अनागोंदी कारभाराने औद्योगिक विकास दर 10वरून 7.3 टक्केवर नेऊन ठेवला आहे. उद्योग बंद पडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या अविचारी निर्णयाने नोटाबंदी, जीएसटीचा प्रयोग फसला आहे.  देशात 60 लाख टन साखर पडून आहे. तरीही पाकिस्तानातून साखर आयात करीत आहेत.  दुसरीकडे शेतकर्‍यांचा माल हमीभावापेक्षा कमी घेतल्यास व्यापार्‍यांना  शिक्षा करू असे अजब निर्णय घेत आहेत. तसे झाल्यास शेतकर्‍यांचा माल घेणार कोण? 

ते म्हणाले, मध्यप्रदेश, राजस्थानसह अन्य हिंदी भाषिक राज्यांत भाजपचा पराभव होणार आहे.महाराष्ट्रातही परिवर्तन घडेल. त्याला सांगलीकर जनतेने साथ द्यावी. 
राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, भाजप सरकारने नोटाबंदी करून सामान्यांना चोर ठरविले. आता रिझर्व्ह बँकेत 99.30 टक्के रक्कम परत जमा झाली आहे. नोटाबंदीचा निर्णय फसला आहे. महिलाओंका सन्मान म्हणून दिलेल्या गॅस सिलिंडरचे दर आजच 60 रुपयांनी वाढविले आहेत. गोरगरीबांसाठी काँग्रेस सरकारने सुरू केलेली अन्न सुरक्षा योजना  बंद केली आहे.  

ते म्हणाले,  भीमा- कोरेगाव दंगल ही सरकारचा पूर्वनियोजित कटच होता. त्यातील मिलिंद एकबोटेला जीवावर येऊन अटक केली. मात्र शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंचे मुख्यमंत्री समर्थनच करीत आहेत. 

विखे पाटील म्हणाले, सांगली महापालिकेसह सर्वच निवडणुकांत यांचा विजय हा पोलिस बळ आणि धनशक्‍तीचा आहे. शिवसेनाही सत्तेत राहून टीकेचा उद्योग करीत आहेत. मात्र सत्तेतून बाहेर पडत नाही.भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी आता सर्वांनी सज्ज होऊ या. ही संघर्ष यात्रा भाजपची सत्ता उलथल्याशिवाय थांबणार नाही.

डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले, जनसामान्यांचे शोषण करणार्‍यांच्याविरोधात हा जनसंघर्षाचा उठाव आहे. त्याची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातून होत आहे. महापालिका निवडणुकीत राज्यभरातील नेत्यांनी पाठबळ दिले. पण सांगलीत आमच्यातीलच मतभेदामुळे पराभव झाला हे मान्य आहे. भाजपचा हा विजय आम्हाला जिव्हारी लागला आहे. पण आम्ही यापुढे हे मतभेद दूर ठेवून सांगली लोकसभा आणि पाठोपाठ सर्वच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकवू. 

पृथ्वीराज पाटील म्हणाले, भाजपची सत्ता उलथून टाकण्यासाठी ही जनसंघर्ष यात्रा सुरू झाली आहे.  महापालिका निवडणुकीतील पराभवाने भाजप हुरळून गेला आहे. आम्हालाही हा पराभव जिव्हारी लागला आहे.  परंतु पराभव बाजूला ठेवून आम्ही एकसंधपणाने कामाला लागू. पुन्हा मोर्चेबांधणी करून काँग्रेसमय जिल्हा बनवू. 

विशाल पाटील म्हणाले, यापुढे फक्त भाजपबरोबर  संघर्ष होणार आहे. जे जाती-पातीच्या नावावर  सत्तेत आले. लाटेवर स्वार झाले. त्यांना लाटेनेच सत्तेवरून घालविण्यासाठीचा हा जनसंघर्ष आहे. डिजिटल फलकांवर कोणाचे फोटो लागले किंवा नाही याचा विचार नको. नेता कार्यकर्त्यांच्या मनात  हवा. यादृष्टीने आम्ही आता ताकदीने कामाला लागलो आहोत. महापालिका निवडणूक आम्ही हरलो. पण आम्ही जनतेत हरलो नाही. कारण काँग्रेसला भाजपपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. आम्ही युद्धात नव्हे तर तहात हरलो आहोत. आमचा पराभव हा जनतेतून नाही तर राजनीती, गटनीती आणि कूटनीतीने झाला आहे.  आता जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने एल्गार सुरू झालेला आहे. पुढचा खासदार, आमदार आणि मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल.