Tue, Jun 25, 2019 15:10होमपेज › Sangli › प्रतिटन २३०० प्रमाणे पैसे खात्यांवर जमा

प्रतिटन २३०० प्रमाणे पैसे खात्यांवर जमा

Published On: Jan 12 2019 1:33AM | Last Updated: Jan 11 2019 11:48PM
सांगली /कोल्हापूर : प्रतिनिधी

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील बहुसंख्य साखर कारखान्यांनी नोव्हेंबरअखेर किंवा दि. 15 डिसेंबरअखेर तुटलेल्या उसाची, प्रतिटन 2300 रुपयांप्रमाणे पहिल्या उचलीची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर जमा केली आहे. सांगली जिल्ह्यात मात्र कोणत्याही कारखान्याने अधिकृतपणे पहिली उचल दिल्याचे जाहीर केलेले नाही किंवा त्या वृत्ताला दुजोराही दिलेला नाही.

 कारखान्यांच्या या कृतीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत संघटनेचा जोर असल्याने त्यांनी एफआरपी एकरकमी देण्याचा आग्रह धरला आहे. त्यासाठी प्रसंगी आंदोलनाचा इशारा देताना कमी एफआरपी भरणारे कारखाने फोडण्याचा इशारा दिला आहे. यात सरकारने हस्तक्षेप करून एकरकमी एफआरपीसाठी कमी पडणारी प्रतिटन 500 रुपयांची रक्कम शासनाने द्यावी, साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल 3400 रुपये करावा, अशी कारखानदारांची मागणी होती. या मागणीसाठी मंगळवारी कारखानदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यांनी गुरुवारी (ता. 10) मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले होेते; पण ही चर्चा पुढे सरकलीच नाही.
सरकारकडून काही मदत मिळणार नाही, हे निश्‍चित झाल्यानंतर शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील बहुसंख्य कारखान्यांनी 30 नोव्हेंबरअखेर तुटलेल्या उसाला प्रतिटन 2300 रुपयांप्रमाणे शेतकर्‍यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले. मात्र सांगली जिल्ह्यातील काही कारखान्यांनी दोन-तीन दिवसांपूर्वीच प्रतिटन 2300 रुपयांप्रमाणे उसाचे पैसे शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर जमा केले आहेत. एक दोन कारखाने सोमवारी किंवा मंगळवारी पैसे जमा करणार आहेत असे समजते. 

कोल्हापूर जिल्ह्यात 14 सहकारी व 7 खासगी असे 21 कारखाने आहेत.  सांगली जिल्ह्यात 12 सहकारी आणि चार खासगी कारखाने आहेत.निर्णयाच्या प्रतिक्रिया उमटतील : खा. राजू शेट्टी कारखानदारांनी एफआरपीची मोडतोड करून पैसे भरले असतील, तर जिल्ह्यात त्याच्या प्रतिक्रिया उमटतील. त्यासाठी कारखानदारांनी तयार रहावे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. कारखान्यांनी पैसे भरल्याची माहिती आपल्यापर्यंत नाही. उद्या ही माहिती घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानीचे खा. राजू शेट्टी यांनी दिली.