Sat, Aug 24, 2019 22:10होमपेज › Sangli › पांढरेवाडीत वाळू चोरी करणारी वाहने ताब्यात

पांढरेवाडीत वाळू चोरी करणारी वाहने ताब्यात

Published On: Mar 07 2018 12:16AM | Last Updated: Mar 06 2018 11:13PMमाडग्याळ : वार्ताहर    

जत तालुक्यातील पांढरेवाडी येथे वाळू चोरी करून पळून जाणारा ट्रॅक्टर व जीप हत्यारांसह पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी पाठलाग करून चौघांना अटक केली. एक ब्रास वाळू  जप्त करण्यात आली.

सोमवारी रात्री पांढरेवाडीत  विनापरवाना वाळू वाहतूक सरू असल्याची खबर पोलिसांनी मिळाली. पोलिस तातडीने घटनास्थळी गेले असता त्यांना पांढरेवाडी ते खंडनाळ  रस्त्यावरून वाळूचा  ट्रॅक्टर  जात असल्याचे आढळले.  पोलिसांना पाहून चालक शंकर रामा पांढरे (वय 40) याने ट्रॅक्टर  वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला.  त्याच्या पाठोपाठ जीप  (एमएच 08 झेड 3246) भरधाव वेगाने जात होती. दोन्ही वाहनांनी पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी धाडसाने पाठलाग करून दोन्ही वाहने  व चौघांना ताब्यात घेतले. यावेळी झाडझडती घेतली असता जीपमध्ये तलवार सापडली.

तसेच ट्रॅक्टरमध्ये भरलेली विनापरवाना घेऊन जात असलेली एक ब्रास वाळू सापडली. यावेळी ट्रॅक्टर डायव्हर शंकर रामा पांढरे जीपमधील भगवान तुकाराम बुधनूर ( वय 30) नामदेव लक्ष्मण खामगळ (वय 30) दोघे रा.तेलसंग ता.अथणी जिल्हा बेळगाव  व  मल्हारी करपे (वय 24) रा.पांढरेवाडी ता.जत यांना अटक करण्यात आली.

कारवाईत पोलिस निरीक्षक भगवान शिंदे , हवालदार पाटील , सरगर, कुंभारे, आटपाडकर सहभाग घेतला. 

मोठ्या कारवाईची गरज 

या परिसरातील बोर नदीतून वाळूची बेकायदा वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. चोरटे रात्रीच्या वेळी तलवार व घातक हत्यारांचा वापर करून येथे वाळूची राजरोस चोरी करीत आहेत. महसूल खात्यातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी  लक्ष  देऊन येथील वाळू माफियांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.