Wed, Jul 17, 2019 10:42होमपेज › Sangli › सांगलीत जिल्हा वैधमापन कार्यालयाची तोडफोड(व्हिडिओ)

सांगलीत जिल्हा वैधमापन कार्यालयाची तोडफोड(व्हिडिओ)

Published On: May 02 2018 3:04PM | Last Updated: May 02 2018 3:00PMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील प्राथमिक दूध संकलन केंद्रावर दुधाचे मापन करीत असताना ती लिटरमध्ये झाली पाहिजे, असा आदेश असतानाही इलेक्ट्रॉनिक वजन काट्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अशा पद्धतीने मापन करणे बेकायदेशीर असल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. परंतु, त्यांनी ती करवाई न केल्यामुळे संभाजी ब्रिगेड व बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा वैधमापन कार्यालयाची तोडफोड केली. 

कार्यालयाची तोडफोड आंदोलन झाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी संभाजी ब्रिगेड व बळीराजा संघटनेच्या 12 कार्यकर्त्यांना अटक केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर हे कार्यालयात आहे. सकाळी 11.30 वाजता या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे सुयोग औंदकर, राजेंद्र पाटील, कार्याध्यक्ष ऋतुराज पवार, संघटक संतोष कोळेकर, प्रताप शिंदे, आबासाहेब काळे, बळीराजा संघटनेचे बी. जी. पाटील, अमोल चव्हाण, संभाजी आडके, सत्यजित पाटील, किरण पाटील आदी कार्यकर्ते कार्यालयामध्ये घुसले. यावेळी वैद्यमापन अधिकारी सुरेश चाटे हे रजेवर होते. याठिकाणी एकच लिपिक होते. घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी खुर्च्या उचलून कार्यालयातील काचेवर आदळण्यास सुरुवात केली. टेबलावरील साहित्य भिरकाण्यात आले, काचेचे ग्लास फोडले. बाकीचे अन्य कर्मचारी दुसर्‍या खोलीमध्ये जावून दरवाजा बंद करून बसले. थोड्यावेळाने या ठिकाणी पोलिस आले. त्यांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंदकर म्हणाले, जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकर्‍यांची दूध विक्री प्राथमिक दूध संकलन केंद्रात केली जाते. हे दूध खरेदी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांचा वापर केला जात आहे. परंतु, इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांवर 50 व शंभर मिलीच्यापटीत दूध मापन केले जाते. परंतु, अनेक ठिकाणी शंभर मिलीच्यापटीत दूध मापन करून दुधाची खरेदी करतात. अशा पद्धतीने मापन केल्यामुळे शंभर मिलीच्या आतील दूध मापले जात नाही. त्यामुळे दिवसाला सरासरी शंभर मिली दूध बिनमापी डेअरीमधे ओतावे लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकर्‍यांचे दररोज प्रत्येक वेळी किमान 5 रुपये प्रमाणे नुकसात होत आहे.   जिल्ह्याचा हिशेब केला तर दिवसाला 25 लाख रुपयांची दूध उत्पादकांची फसवणूक केली जात असल्‍याचा आरोप संघटनेच्या  कार्यकर्त्यांनी केला आहे. 

यासंदर्भात सहा महिन्यांपासून जिल्हा वैधमापन विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. परंतु, वैद्य मापन विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तीव्र आंदोलन करण्यात आले.  घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर, विश्रामबागचे पोलिस निरीक्षक भिंगारदेवे आदींनी भेट देऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.


मंत्र्यांच्या आदेशामुळे कारवाई थांबवली
पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर हे घटनास्थळी दाखल झाले. कार्यकर्त्यांनी आंदोलन का केले याची माहिती त्यांनी कर्मचार्‍यांकडून घेतली. दुधाचे मापन इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर करू नये, ते लिटरपद्धतीने करावे, अशा मागणीचे निवेदन गेल्या महिन्यात वैद्य मापन कार्यालयांना देण्यात आले होते. यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्याबरोबर बैठकही झाली होती. त्यांनी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, त्यानंतर मंत्र्यांनी संबंधीतांवर कारवाई करू नये, असे लेखी आदेश वैधमापन कार्यालयांना दिल्याचे यावेळी कर्मचार्‍यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे कारवाई करण्यात आली नसल्याचे यावेळी उघडकीस आले. 

वैद्य मापन कार्यालय नेहमीच ओस

नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर जिल्हा वैधमापन कार्यालय आहे. परंतु, या ठिकाणी अधिकारीच हजर नसल्याची माहिती समोर आली. एखाद दुसरा लिपीक या ठिकाणी बसून असतो. लोकांच्या आलेल्या तक्रारी घेणे, निवेदने स्वीकारणे आदी कामाशिवाय या ठिकाणी कोणतेही काम सुरू नसल्याचा आरोप औंदकर यांनी केला. आजही कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, त्यावेळी या ठिकाणी केवळ एकच लिपीक उपस्थित होते. मुख्य अधिकारी रजेवर गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जनतेच्या सेवेसाठी असणारे हे कार्यालय नेहमीच ओस पडलेले असल्याचा आरोप औंदकर यांनी केला.
 

Tags : Sangli districts validation office, sambhaji brigade, baliraja organics