Fri, Nov 16, 2018 09:47होमपेज › Sangli › महामोर्चास परवानगी देऊ नये

महामोर्चास परवानगी देऊ नये

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शिवप्रतिष्ठानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ बुधवारी राज्यभरात मोर्चे काढण्यात येणार आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल असताना हा मोर्चा कसा काढण्यात येत आहे. हा मोर्चा समाजात तेढ निर्माण करणारा आहे. त्यामुळे या महामोर्चास परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी आंबेडकरी संघटनांतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन विश्रामबाग पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल असताना त्याच्या समर्थनात कोणत्या कायद्याखाली मोर्चा, निवेदन, जाहिरात करता येते का, याचा खुलासा करावा. जर या मोर्चास परवानगी असेल तर पोलिस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांनी त्याला पाठिंबा दिला आहे का?  या मोर्चाला परवानी असेल तर इतर सर्वच गुन्हेगार, आरोपींच्या बाबतीत भविष्यकाळात निघणार्‍या मोर्चांना परवानगी देणार का, असा प्रश्‍नही उपस्थित करण्यात आला आहे. 

भिडे समाजामध्ये तेढ निर्माण करत असतात. हा मोर्चा जास्तच तेढ निर्माण करणारा आहे. पोलिस प्रशासन शहरात शांतता नांदू नये यासाठी प्रयत्नशील आहे का? भारतीय दंड संहिता व इतर कायदे मोडणारे लोक व त्यांचे समर्थक लोकशाहीवादी असू शकतात का?  भिडे यांच्यावर शासनाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थनात उतरणार्‍या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. 

निवेदनावर संजय कांबळे, अमोल वेटम, प्रमोद सांगले, प्रशांत कांबळे, अनिकेत सावंत, देवधर सांगले, अमोल हर्ष, प्रशांत कांबळे, योगेश भाले, विकास कांबळे आदींच्या सह्या आहेत.


  •