होमपेज › Sangli › गावगुंडांवर कारवाईसाठी अंकलीत बंद 

गावगुंडांवर कारवाईसाठी अंकलीत बंद 

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 19 2018 8:57PMसमडोळी ; वार्ताहर 

अंकली (ता. मिरज) येथील तडीपारीची कारवाई झालेला रेकॉर्डवरील गुन्हेगार व त्याच्या साथीदारांवर मोकातंर्गत कारवाईच्या मागणीसाठी शुक्रवारी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.  सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला आणि ग्रामस्थ यांनी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तडीपारीची कारवाई झालेली असतानाही  गुंड  राजरोसपणे दमदाटी, धमकावणे यासारखी कृत्ये करीत आहेत. त्यांचे साथीदारही गावात दहशत माजवित आहेत. त्यामुळे ग्रामस्थ व व्यावसायिकांत भीतीचे वातावरण आहे. नुकताच  एका कराटे प्रशिक्षकाला मारहाणीचा प्रकार घडला आहे. 

दोन दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये बिल देण्यावरून मालकास धमकी देत शिवीगाळ करुन मोडतोड करण्यात आली. एका युवकास या गुंडांनी मारहाण केली. याबरोबरच महिला व युवतींची छेडछाड काढणे, अश्‍लील वर्तन करणे असा त्रास सुरू आहे. याबाबत तक्रार केल्यास धमकीची भाषा वापरली जाते. यामुळे महिला व युवतींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.  या गुंडांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी आज गाव बंद ठेवून निषेध 
व्यक्त करण्यात आला.