Mon, Jun 24, 2019 17:18होमपेज › Sangli › कचरा डेपोमध्ये येणार्‍या गाड्या अडविल्या

कचरा डेपोमध्ये येणार्‍या गाड्या अडविल्या

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 9:22PM

बुकमार्क करा
कवठेपिरान : वार्ताहर 

समडोळी - कवठेपिरान मार्गावरील कचरा डेपोला संरक्षक भिंत बांधावी या मागणीसाठी शुक्रवारी कवठेपिरानसह भागातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत रास्तारोको आंदोलन केले. यानंतर तातडीने महापालिका पदाधिकार्‍यांनी धाव घेत संरक्षक भिंतीच्या कामाचा नारळ फोडला. समडोळी मार्गावर महापालिकेचा कचरा डेपो आहे. या ठिकाणचा कचरा वारंवार रस्त्यावर येतो.

तो पेटवून देण्यात येत असल्याने प्रदूषणामुळे या भागातील ग्रामस्थ त्रस्त झाले होते.  पाठपुरावा करुनही पालिका लक्ष देत नसल्याने संतप्त लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी आज पैलवान भीमराव माने यांच्या नेतृत्वाखाली कचरा डेपोसमोरच रास्तारोको आंदोलन केले. माने म्हणाले, हा कचरा डेपो रस्त्याललगत आहे. येथे संरक्षक भिंत नाही,  तसेच कचर्‍यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही.

सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. कचरा पेटविला जातो. त्यामुळे  सतत धुराचे लोट निघत असतात. धुरामुळे येथे अनेकअपघात झाले आहेत. याकडे महापालिका लक्ष देत नाही. अनेक महापौर, आयुक्त आले..गेले.. मात्र हा प्रश्‍न तसाच राहिला. यामुळे आता लोकच रस्त्यावर उतरले आहेत.  
दरम्यान, तातडीने महापौर हारूण शिकलगार यांनी धाव घेत संरक्षक भिंतीच्या कामाला प्रारंभ केला.

यावेळी माने यांनी येथे आता कचरा पेटविण्याचे प्रकार बंद करा, जनावरांचे मांस, हाडे उघड्यावर टाकू नका अशा मागण्या केल्या. जर यात कुचराई झाली तर मात्र येथील कचरा महापालिकेच्या दारात टाकण्याचा त्यांनी इशारा दिला. पालिकेचे उपायुक्त  सुनील पवार म्हणाले,  हे काम पूर्ण करू. कवठेपिरानचे उपसरपंच सागर पाटील, दुधगावचे सरपंच विकास कदम, समडोळीचे सरपंच विलास अडसूळ, उपसरपंच प्रमोद ढोले, संजय बेले, माळवाडीचे उपसरपंच रमेश निर्वाणे, भरत जाधव, शिवसेनेचे उमाकांत कार्वेकर, पैलवान बंडा तामगावे, रघुनाथ दिंडे, अरविंद सावर्डे, राहुल जाधव, सुनील सुतार उपस्थित होते.