Wed, Jul 17, 2019 20:51होमपेज › Sangli › विकासाला मदत करणारे फलकांवरील नियम कागदावरच

गावोगावच्या फलकांवरील नियम कागदावरच

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 20 2018 9:20PMकवठेपिरान : संजय खंबाळे 

गावागावामध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीत लावण्यात येणार्‍या जाहिरात फलकांतून महसूल मिळवण्यासाठी सरकारने ग्रामपंचायतींना सूचना केल्या आहेत. या सूचनांकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष झाले आहे. गावात विनापरवाना लावण्यात येणार्‍या फलकामुळे उत्पन्नात घट होत आहे. 

गावागावामध्ये होणारे विविध कार्यक्रम, उत्सव, यात्रा, राष्ट्रीय सण, वाढदिवस, शुभेच्छा, अभिनंदन अशा अनेक प्रकारच्या जाहिरातींचे फलक  झळकत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक नेतेमंडळी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह   आपले फोटो असलेले मोठ-मोठे फलक उभे करू लागले आहेत. हे फलक लावत असताना कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीला मिळणार्‍या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे शासनाची योजना हवेतच विरत आहे. 

ग्रामपंचायतीच्या विकासाला मदत करण्यासाठी फलक व जाहिरातीच्या माध्यमातून महसूल उपलब्ध करून घेण्यात यावा या उद्देशाने सरकारने ग्रामपंचायतीच्या हद्दीत लावण्यात येणार्‍या फलकांना शुल्क घेण्याची सूचना केली आहे. मात्र बहुसंख्य ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते आहे. 

गावामध्ये कोणीही कुठेही फलक  लावत आहेत. यावर कोणत्याच प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. ग्रामपंचायत कायद्याच्या नियमानुसार ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी फलक लावताना ग्रामपंचायतीची परवानगी व त्याचे शुल्क भरणे बंधनकारक आहे.   विनापरवाना फलक लावणार्‍यावर कारवाई करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करून आज अनेक फलक झळकत आहेत. 

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून युवकांची फळी तयार करण्याच्या दृष्टीने त्यांचा फोटो लावून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. फलकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याची माहिती ग्रामपंचायत सचिव, विकास अधिकारी यांना असूनदेखील ते दुर्लक्ष करत आहेत.  

डिजिटल फलक लावण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी शिवाय जे फलक लावण्यात येत आहेत. त्यांच्यावरती कारवाई करुन दंड वसूल केला जाईल. तशा सूचनाही ग्रामपंचायतीला दिल्या आहेत. त्यासाठी विशेष मोहीम लवकरच सुरू करणार आहे. 
    - राहुल रोकडे, गटविकास अधिकारी, मिरज