होमपेज › Sangli › सांगलीत दोन बंद घरे फोडली

सांगलीत दोन बंद घरे फोडली

Published On: May 21 2018 1:04AM | Last Updated: May 20 2018 10:37PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील शंभर फुटी रस्ता परिसरातील अरिहंत कॉलनी तसेच विश्रामबाग येथील हनुमाननगर येथील दोन बंद घरे चोरट्यांनी फोडली. यामध्ये सोन्याचे दागिने, एलईडी टीव्ही यासह सव्वा लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. शनिवारी या दोन्ही घटना उघडकीस आल्या. याबाबत सांगली शहर, विश्रामबाग पोलिस ठाण्यात रविवारी नोंद करण्यात आली आहे. 

अरिहंत  कॉलनीतील शिवराज मल्लाप्पा  माळी  (वय 20) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माळी मूळचे नांद्य्राचे आहेत. अरिहंत कॉलनीतील घराला कुलूप लावून दि. 15 रोजी ते परगावी गेले होते. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास ते परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील कपाटात ठेवलेले 75 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे दिसून आले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हनुमाननगर येथील चोरीप्रकरणी नसिमा तौफीक मोमीन (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे. मोमीन गुरुवारी रात्री सातच्या सुमारास घराला कुलूप लावून परगावी गेल्या होत्या. शनिवारी सकाळी पाचच्या सुमारास त्या परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. हॉलमधील एलईडी टीव्ही तसेच कपाटात ठेवलेले कानातील सोन्याचे झुमके, एलईडी लाईटच्या माळा असा सुमारे पन्नास हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.