Fri, Jul 19, 2019 19:56होमपेज › Sangli › जबरी चोर्‍या करणारी तिघांची टोळी तडीपार

जबरी चोर्‍या करणारी तिघांची टोळी तडीपार

Published On: Jan 17 2018 2:03AM | Last Updated: Jan 16 2018 11:45PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

जबरी चोरी कऱणे, बेकायदा  आणि विनापरवाना हत्यार बाळगणे या प्रकरणी पोलिसांनी तिघांच्या टोळीला   दोन वषार्ंसाठी चार जिल्ह्यांतून तडीपार केले आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी ही कारवाई केली. हरिदास तानाजी कोळेकर(वय 22, रा. आरेवाडी), इंद्रजीत  दिनकर पाटील(वय 20, रा. निंबळक) आणि कैलास किसन कोळेकर(वय 23, रा. आरेवाडी) यांचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी  ःटोळी प्रमुख हरिदास कोळेकर हा त्याच्या साथीदारासह जबरी चोर्‍या करीत होता. त्याशिवाय   लोकांना धमकवणे, बेकायदा आणि विना परवाना  हत्यारे बाळगणे आदी प्रकारचे पाच गुन्हे त्यांच्याविरोधात दाखल आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अनेकदा त्यांच्यावर कारवाई केली. मात्र तरीसुद्धा त्यांच्या वर्तनात फारसा बदल झाला नाही. 

आरेवाडी आणि कवठेमहांकाळ या परिसरात संघटितपणे ही टोळी चोर्‍या करीत होती. त्यामुळे त्या परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले होते. लोक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्याचे धाडस करीत नव्हते. भविष्यात शांतता आणि सुव्यवस्था बिघडण्याचा धोका निर्माण झाला होता.  त्यामुळे या तिघांना तडीपार करण्याचे आदेश शर्मा यांनी दिले होते. त्यानुसार प्रस्ताव तयार करून तिघांनाही सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.