Fri, Apr 26, 2019 09:23होमपेज › Sangli › सांगलीत बंद बंगला फोडला

सांगलीत बंद बंगला फोडला

Published On: Jan 02 2018 1:13AM | Last Updated: Jan 02 2018 12:26AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

शहरातील संजयनगर येथील ख्वाजा कॉलनीशेजारील गजानन कॉलनीतील बंद बंगला फोडून चोरट्यांनी दहा लाखांचा ऐवज लंपास केला. यामध्ये दीड लाखाची रोकड, 26 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, दोनशे ग्रॅम चांदी, एलईडी टीव्ही, मोपेड यांचा समावेश आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. याबाबत रात्री उशिरा संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत चांदमोहम्मद जानमोहम्मद खान (वय 36) यांनी फिर्याद दिली आहे. खान यांचे कुपवाड रस्ता परिसरात पीओपी साहित्य विक्रीचे दुकान आहे. गजानन कॉलनीत त्यांचा बंगला आहे. खान कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशमधील गोंडा तालुक्यातील धमोली येथील आहेत. गेल्या 15 वर्षांपासून ते व्यवसायानिमित्त सांगलीत स्थायिक झाले आहेत. 

शनिवारी सायंकाळी खान कुटुंबीय बंगल्याला कुलूप लावून नातेवाईकांच्या विवाहासाठी जळगावला गेले होते. सोमवारी दुपारी ते परत आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. आतील बेडरूममध्ये ठेवलेले कपाट फोडून त्यातील 26 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, दीड लाखाची रोकड, दोनशे ग्रॅमचे चांदीचे दागिने असा ऐवज लंपास केला. त्यानंतर हॉलमधील एलईडी टीव्ही व बंगल्याबाहेर लावलेली मोपेडही लंपास केली. 

पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ठसेतज्ज्ञांनी ठसे घेतले आहेत. श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते; मात्र श्‍वान जवाहर हौसिंग सोसायटीपर्यंत जाऊन तेथेच घुटमळले. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील अधिक तपास करीत आहेत.