Tue, May 21, 2019 12:08होमपेज › Sangli › कडेगाव तालुक्यात नदी, बंधारे कोरडे

कडेगाव तालुक्यात नदी, बंधारे कोरडे

Published On: Sep 04 2018 1:19AM | Last Updated: Sep 03 2018 8:41PMकडेगाव : संदीप पाटील 

कडेगाव तालुक्यात चालू वर्षीच्या पावसाळ्यात एकही मोठा पाऊस न पडल्याने काही दिवसापासून  नदी, ओढे, बंधारे, तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. परिणामी ऐन पावसाळ्यात शेती, पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात नदी, ओढे, बंधारे ओसंडून वाहतात. परिणामी आजपर्यंत तालुक्यात ऑगस्ट -सप्टेंबरमध्ये कधी पाण्याची समस्या जाणवली नव्हती. परंतु यावर्षी अपेक्षित पाऊस न पडल्याने काही ठिकाणी पिके वाळू लागल्याने शेतकरी हतबल बनला आहे. तालुक्यात या वर्षी जून, जुलैमध्ये पावसाने दमदारपणे सुरुवात केल्याने सोयाबीन, घेवडा, भूईमूग, ज्वारी, मका, मूग यांसह अन्य पिकांची शेकडो हेक्टरवर शेतकर्‍यांनी  पेरणी केली आहे. परंतु  पावसाअभावी ही पिके वाळू लागल्याने ही पिके जगवायची कशी, असा प्रश्‍न आहे.

आधीच उसात आलेल्या हुमणी किडीने शेकडो एकरावरील उसाच्या क्षेत्राची अक्षरशः चाळण झाली आहे. शेतकरी ही हुमणी कीड नियंत्रित आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. परंतु काही केल्या ही कीड नियंत्रित होेत नसल्याने ही कीड शेतकर्‍यांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. तालुक्यातील येरळा नदीपात्र कोरडे ठणठणीत पडले आहे.काही गावांतील विहिरी, बंधार्‍यातील पाण्याने तळ गाठला आहे.