Wed, Apr 24, 2019 19:53होमपेज › Sangli › वारणाकाठी पिकतोय विदेशी भाजीपाला

वारणाकाठी पिकतोय विदेशी भाजीपाला

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 25 2018 8:07PMमातीतलं सोनं : विवेक दाभोळे

हुकमी ऊसपट्टा असलेल्या वारणा टापूत, युवा प्रयोगशील शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करीत आहेत. वारणा काठच्या  शिगाव येथे कौस्तुभ राजेंद्र बारवडे  या युवा अभियंता शेतकर्‍याने चक्क विदेशी भाजीपाल्याची लागवड आणि विक्री देखील यशस्वी केली आहे. गेल्या हंगामात जेमतेम दीड पावणेदोन एकर शेतीत या विदेशी भाजीपाला शेतीतून त्याने अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. 

कौस्तुभने प्रामुख्याने झुकेली, ब्रोकोली, चेरी टोमॅटो, बेसील, पॉपचाई, रेड कॅबेज आदींची लागवड केली आहे. झुकेली अर्धा एकरात केली आहे. रोप लावणीनंतर महिना सव्वा महिन्यात उत्पादन सुरू होते.  आता हंगाम संपत आला आहे.  पुणे, गोवा येथून झुकेलीस वाढती मागणी असते.  प्रतिकिलो 30 ते 35 रु. दर मिळतो. काही व्यापार्‍यांबरोबर 35 रु. किलोचा दर निश्‍चित करुन विक्री केली. गेल्या हंगामात 35 रु. दराने विक्री केली, त्यातून 50 ते 60 हजाराचे उत्पन्न मिळाले. ब्रोकीलची रोपे लावावी लागतात.  प्रतिकिलोचा  दर 30 रु. राहतो.  याखेरीज सात गुंठ्यात चेरी टोमॅटो लावला होता. त्याचे 45 दिवसांत उत्पादन सुरू झाले. प्रतिकिलोचा दर 30 रु. मिळाला. यातून  खर्च वजा जाता दीड लाखाचा फायदा हातात राहिला.

बेसीलची लागवड 17 गुंठ्यात केली होती. त्यातून साठ हजाराचे उत्पन्न निघाले. म्हणजे बेसील वनस्पती ही औषधी असल्यामुळे फारसा औषधांचा  खर्च येत नाही. आज वारणा काठच्या सार्‍या भागात विदेशी भाजीपाला उत्पादनातील अनुभवी शेतकरी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.

झुकेली ही काकडीसारखी वेलवर्गीय फळभाजी आहे. झुकेलीस पंचतारांकित हॉटेल्स्मध्ये मोठी मागणी असते. ब्रोकील ही फ्लॉवरसारखी हिरव्या रंगाची भाजी आहे. ब्रोकीलला देखील मोठ्या शहरात मागणी वाढती आहे. तुळसवर्गीय वनस्पती असलेल्याआयुर्वेदिक औषध निर्मितीसाठी बेसीलचा वापर केला जातो. बेसीलची मागणी कायम राहणार हे नक्की. याचबरोबर रेड कॅबेज ही भाजी तांबूस रंगाची आहे. पॉपचॉई ही भाजी देखील कोबीसारखीच असते. तिची पाने, कंद भाजीसाठी वापरतात. याला बाजारातही मागणी आहे.