Fri, Sep 21, 2018 05:36



होमपेज › Sangli › महसूल कर्मचार्‍यांचा कामकाजावर बहिष्कार 

महसूल कर्मचार्‍यांचा कामकाजावर बहिष्कार 

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 07 2017 11:47PM

बुकमार्क करा





सांगली/इस्लामपूर :  

वाळव्याचे तहसीलदार नागेश पाटील यांनी तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यास मारहाण केल्याच्या निषेधार्थ  जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील महसूलच्या कर्मचार्‍यांनी गुरुवारी काम बंद आंदोलन केले. दरम्यान, इस्लामपूर येथे   तहसील व प्रांत कार्यालयातील कर्मचार्‍यांनीही काम बंद आंदोलन केले.

जोपर्यंत तहसीलदार पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्यांची जिल्ह्याबाहेर बदली होत नाही तोपर्यंत कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांना संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिले

निवडणूक कामकाजात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून बुधवारी  तहसीलदार पाटील यांनी लिपीक सुनील साळुंखे यांना अर्वाच्य शिवीगाळ करीत श्रीमुखात लगावली, अशी तक्रार आहे.या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील महसूलच्या कर्मचार्‍यांनी दिवसभर कामबंद आंदोलन केले. त्यामुळे बहुसंख्य कार्यालयात  शुकशुकाट होता. सायंकाळीत बैठकीत आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.  

महसूल कर्मचारी संघटनेने अप्पर जिल्हाधिकारी चव्हाण यांना  निवेदन देऊन तहसीलदार पाटील यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी केली. जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत कामकाजावर बेमुदत बहिष्कार टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

निवेदनात म्हटले आहे की, तहसीलदार पाटील यांची पदभार स्वीकारल्यापासून कर्मचार्‍यांवर दादागिरी सुरू आहे. बुधवारचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून फौजदारी दाखल करावी. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू कदम, सरचिटणीस चंद्रकांत पार्लेकर, पुणे विभागीय सचिव कैलास कोळेकर जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष उपस्थित होते.